नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी संभाजी ब्रिगेडची फौज मैदानात

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजी ब्रिगेड नगर दक्षिणच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित ‘शेतकऱयांचा आसूड’ हे पुस्तक भेट देण्यात आले. त्यांना पाठिंबा जाहीर करत त्यांच्या प्रचारासाठी संभाजी ब्रिगेडची फौज मैदानात उतरणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱयांना वेळ देऊन विविध प्रश्नांच्यावर चर्चा केली तसेच शेतकऱयांसाठी सदैव लढत राहणार असल्याचे सांगितले. साकळाई पाणीप्रश्न सोडविणार असल्याचे तसेच शेतकऱयांच्या कांदा, दूध, कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना हमीभाव आणि शेतकऱयांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लंके यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱयांना सांगितले. नगर दक्षिणमधील संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नीलेश लंके यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी संग्राम देशमुख, नगर जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे, जिल्हा संघटक गणेश पारे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नानाजी शिंदे, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे, केशव देशमुख, मयूर धनवडे, महेश लाहोर, मुन्ना मुंडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.