महाराष्ट्रातील 8 जागांवर आज मतदान; बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, परभणीत शिवसेनेचे शिलेदार रिंगणात

महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठ जागांवर शुक्रवारी मतदान होत आहे. बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर, हिंगोलीत नागेश पाटील-आष्टीकर, यवतमाळ-वाशीममध्ये संजय देशमुख, परभणीत संजय जाधव हे शिवसेनेचे शिलेदार रिंगणात आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण, अमरावतीत बळवंत वानखेडे, अकोल्यात डॉ. अभय पाटील तर वर्ध्यात राष्ट्रवादीचे अमर काळे लढत आहेत.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडय़ातील तीन आणि विदर्भातील पाच मतदारासंघात आज मतदान होत आहे.

नांदेड मतदारसंघात भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात लढत होत आहे. मतदारसंघात 2062 मतदान पेंद्रे असून 18.51 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात प्रथमच 16 मतदान पेंद्रे महिला चालवणार आहेत.

हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागेश पाटील-आष्टीकर आणि मिंधे गटाचे बाबुराव कदम कोहाळीकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे बी.डी. चव्हाण यांच्यात लढत होत आहे. 2006 मतदान पेंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली असून 18.17 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

परभणी मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय जाधव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात थेट लढत होत आहे. 2290 मतदान पेंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून 21.23 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

बुलढाणा मतदारसंघात 1962 मतदार पेंद्रांवर 17.82 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रा. नरेंद्र खेडेकर, मिंधे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

अमरावती मतदार संघात भाजपाच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत आहे. तर आ. बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बूब यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या राजश्री पाटील तर काँग्रेसकडून संजय देशमुख निवडणूक रिंगणात आहेत.

अकोला मतदार संघात भाजपाचे अनूप धोत्रे तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत.

वर्धा लोकसभा मतदार संघातून सध्याचे खासदार भाजपाचे रामदास तडस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे मैदानात आहेत.

दुसऱ्या टप्प्यात 88 जागा

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या उत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर उद्या मतदान होणार आहे. एकीकडे तळपते ऊन आणि दुसरीकडे मतदान केंद्रांवर मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची कसरत असे चित्र देशभरात दिसणार आहे. या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल जागेवर बहुजन समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 1 हजार 198 उमेदवार रिंगणात आहेत. यात 1,097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत. तर एक उमेदवार तृतीयपंथी आहे. दरम्यान, 1 हजार 192 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 21 टक्के म्हणजेच 250 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 390 म्हणजेच 33 टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्यांच्याकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे.