विखे कुटुंबातील नंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले? शरद पवार यांची विखे पिता-पुत्रावर घणाघाती टीका

या लोकसभा निवडणुकीत मोदी गॅरंटीचा गवगवा केला जातोय. ही गॅरंटी टिकाऊ नाही; त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही. मोदी यांनी सत्तेचा गैरवापर केला. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खोटय़ा केसेस दाखल केल्या. त्यांच्या विचाराविरोधात वागले तर ईडी, सीबीआयचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. दरम्यान, स्व. धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यानंतर विखे यांच्या नंतरच्या पिढय़ांनी काय दिवे लावले, असा सवाल करत, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी ते आता टीकाटिप्पणी करीत आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.

नगर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी आमदार दादा कळमकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, रावसाहेब म्हस्के, संदीप वर्पे, योगिता राजळे, अरुण कडू, किरण कडू, अरुण तनपुरे, सचिन म्हसे, अमृत धुमाळ, राजूभाऊ शेटे, धनराज गाडे, बाळासाहेब आढाव, प्रकाश देठे, सुरेश वाबळे, मच्छिंद्र सोनवणे, संपत म्हस्के यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

शरद पवार म्हणाले, दुष्काळी जिल्हा म्हणून नगरची ओळख होती. त्या काळात जिरायत भागाच्या जमिनी बागायती करण्यासाठी निळवंडे प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यावेळी आज जे निवडणुकीच्या रिंगणातील विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या वाडवडिलांनी निळवंडेला विरोध केला. आता ते पुन्हा लोकसभेमध्ये जाऊ पाहत आहेत. त्यांना रोखण्याचे काम करावे लागेल, असे आवाहन पवार यांनी केले.

दहा वर्षे ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी काय काम केले, असा सवाल करून पवार म्हणाले, मोदी सरकारने केलेली कामे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात मांडली पाहिजेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. दहा वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करून मोदी हे महागाईवर बोलत होते. सत्ता हाती दिल्यानंतर 15 दिवसांत 50 टक्के महागाई करणार असे मोदी सांगत होते. 70 रुपयांचे पेट्रोल 106 रुपयांवर गेले, हे पन्नास टक्के महागाई कमी करण्याचे वचन का? 400 रुपयांचा सिलिंडर 1160 वर गेला, असेही पवार यांनी सांगितले. निवडणुकीत मोदी गॅरंटीचा गवगवा केला जातोय. ही गॅरंटी टिकाऊ नाही. त्यांच्या गॅरंटीचा चेक वटत नाही. मोदी यांनी सत्तेचा गैरवापर केला. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून खोटय़ा केसेस केल्या. त्यांच्या विचाराविरोधात वागले तर ईडी, सीबीआयचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही पवार यांनी सांगितले.

नगर जिह्यात सत्तेचा गैरवापर, दमदाटी

राज्यात उत्तम साखर कारखाना म्हणून ओळख असलेला राहुरी साखर कारखाना, मुळा प्रवरा वीज संस्था या संस्था विखे यांनी बंद पाडल्या. शासकीय मेडिकल कॉलेज जिह्यात होऊ दिले नाही. त्यांच्या खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश कशा पद्धतीने दिले जातात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नगर जिह्यात सत्तेचा गैरवापर, दमदाटी सुरू असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

विविध घटकांच्या प्रश्नांसाठी नीलेश लंके हे उत्तर

आमचा उमेदवार दिसायला फाटका आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा हा माणूस. कांदा, कापूस, सोयाबीन आदी शेतकरीवर्गाशी निगडित प्रश्न, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी नीलेश लंके हेच एकमेव उत्तर असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

कोणी इंग्रजी बोलतो म्हणून शहाणा झाला असे होत नाही

कोणी इंग्रजी बोलतो म्हणून शहाणा झाला असे होत नाही. तुमचे इंग्रजी बोलणे तुम्हाला लखलाभ, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी सुजय विखे यांना लगावला. नीलेश लंके यांच्यासारखा फाटका माणूस, फाटक्या माणसाच्या हिताची जपवणूक करणारा असल्याने लंके यांना मताधिक्क्याने लोकसभेत पाठवण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

आमच्याकडे स्वाभिमानी गर्दी – प्राजक्त तनपुरे

काल, परवा विरोधकांची सभा झाली. 500 रुपये देतो असे सांगून गर्दी जमा केली. 100 रुपये आगाऊ रक्कम दिली, त्यानंतर उरलेली रक्कम दिलीच नाही. आज आमच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमा केलेली नाही. येथे स्वाभिमानी नागरिकांची गर्दी असल्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले