Lok Sabha Election 2024 : सुनीता केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप

माझे पती अरविंद केजरीवाल यांना ठार मारायचे असल्यामुळेच भाजपप्रणित केंद्र सरकार त्यांना इन्सुलिन नाकारत असल्याचा आरोप केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी सभेत केला.  गेली 12 वर्षे ते मधुमेहासाठी इन्सुलिन घेत आहेत, त्यांना दररोज इन्सुलिन घ्यायची गरज आहे, असे सुनिता यांनी रांची येथील उलगुलान न्याय सभेत सांगितले.

तिसऱ्या टप्प्यात 317 उमेदवारांचे अर्ज वैध

लोकसभा निवडणुकीच्या  तिसऱ्या टप्प्यातील 11  मतदारसंघात 317 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत  उद्या  सोमवारी संपुष्टात येत असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात येत्या 7 मे रोजी निवडणूक होत आहे.

कश्मीरमध्ये भाजप रिंगणात नाही!

कश्मीरमध्ये काहीच स्थान नसल्यामुळे भाजप येथील तीन लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे करत नसल्याची टीका जम्मू-कश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष विकार रसूल वाणी यांनी आज सांगितले. जम्मू येथील दोन्ही जागाही काँग्रेसच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास राज्याचा दर्जा परत दिला जाईल आणि निवडणुकाही घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

भाजप आता मोदीपूजकांचा पंथ

भाजप हा आता राजकीय पक्ष राहिला नसून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्तांचा पंथ बनला आहे, अशी बोचरी टीका आज काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी केली. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. इंडिया आघाडी तामीळनाडूतील सर्व 39 जागा आणि पुद्दुचेरी येथील एक जागा जिंकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.