कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या खर्चाचा समावेश उमेदवाराच्या खर्चात  होणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून उमेदवार लवकरच नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरुवात करणार आहेत. मात्र ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेदवारासमवेत मोठय़ा संख्येने येणारे कार्यकर्ते, त्यांची वाहने, आणि संबंधित इतर खर्च हा निवडणूक खर्चात मोडणार आहे. मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱया कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडीओ छायाचित्रणासह नोंद ठेवण्याचे निर्देश दक्षिण-मध्य मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत.

‘ओल्ड कस्टम इमारती’च्या सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पानसरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयपीएस प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील संबंधित अधिकारीदेखील उपस्थित होते.

…तर उमेदवारी होईल रद्द 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने त्याचा प्रचार करताना केलेला खर्च हा निर्धारित रकमेपेक्षा अधिक आढळल्यास निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पानसरे यांनी स्पष्ट केले.