…ही तर भाजपची मोठी चूक, अखिलेश यादव यांनी साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सध्या भाजपचे उमेदवार अरुण गोविल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यघटना आणि संविधान यातील फरक संविधानात सुधारणा आणि मूलभूत बदल यातील फरक ज्यांना समजत नाही, अशा लोकांना उमेदवारी देत भाजपने मोठी चूक केली आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.  समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अरुण गोविल यांना भाजपने उमेदवारी देऊन मोठी चूक केल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर केली, त्यामध्ये ते म्हणाले की, जी लोकं संविधानात प्रगतशील सुधारणा आणि मूलभूत बदल यातला फरक समजू शकत नाही, त्यांना उमेदवारी देत  भाजपने मोठी चूक केली आहे. मात्र, आता भाजपच्या कोणत्याही निर्णयाने किंवा कोणालाही उमेदवारी देण्याने काहीही फरक पडणार नाही. आता जनतेनेच भाजप उमेदवारांचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे, असेही अखिलेश म्हणाले.

संविधानात बदल करत भाजप गरीब, वंचित, शोषीत, शेतकरी, तरुण आणि महिला यांचे हक्क आणि आरक्षण नष्ट करण्याचा डाव आखत आहे. भांडवलदारांच्या बाजूने धोरणे आणि योजना बनवून ते त्यांच्या अब्जाधीश मित्रांचा फायदा करण्याचा बेत आखत आहेत. जनतेकडून पैसे गोळा करून ते भाजप त्यांच्या मित्रांना देत त्यांची तिजोरी भरत आहेत, असा हल्लाबोलही अखिलेश यांनी केला.

उत्तर प्रदेश आणि देशातील जनता यावेळी भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही आणि भाजपला पराभूत करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपा हराओ, संविधान बचाओ! असेही ते म्हणाले आहेत. सोशल मीडिया साइटवर अखिलेश यादव यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत मेरठचे भाजप उमेदवार अरुण गोविल सांगत आहेत की, ज्यावेळी आपले संविधान बनले होते त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आज ती हळूहळू बदललेली आहे. बदल करणे हे प्रगतीचे लक्षण आहे त्यात वाईट काहीच नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज वेगळी आहे. त्यानुसार काहीतरी बदलण्याची आवश्यकता असल्यास एका व्यक्तीच्या मर्जीने राज्यघटना बदलली जाणार नाही. सर्वांची संमती आवश्यक असेल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर अखिलेश यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साझला.