प्रसिद्धीची मोहीम नाही… ही तर प्रसिद्धीची हाव! 31 मार्चपर्यंत रेल्वे, एसटी, टीव्ही, रेडिओ, इस्पितळे, मोबाईलवर सर्वत्र मिंधेच मिंधे

निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने आपल्या प्रसिद्धीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारकडून 31 मार्चपर्यंत विशेष प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात रेल्वे, एसटी, बसेस, टीव्ही, रेडियो, इस्पितळे, मोबाईल फोन, सोशल मीडिया अशा सर्वच माध्यमांतून मिंधे सरकारच्या जाहिराती केल्या जाणार आहेत. या मोहिमेवर एका महिन्यात तब्बल 84 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चुराडा केला जाणार आहे. या खर्चाला तातडीने मान्यताही देण्यात आली आहे.

मिंधे सरकारच्या विशेष प्रसिद्धी मोहिमेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या मोहिमेवर 84 कोटी 10 लाख 50 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. मिंधे सरकारचे निर्णय, उपक्रम, विकासकामे, योजना यांची माहिती जाहिरातींद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

कशावर किती खर्च होणार…
पोस्टर्स, ऑडिओ, व्हीडिओ
75 लाख 50 हजार रुपये
वर्तमानपत्रांतील जाहिराती
20 कोटी रुपये
इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहिराती
20 कोटी 80 लाख रुपये
होर्डिंग्ज, साईनबोर्ड, रेल्वे व मेट्रो स्थानके,
लोकल्स व मेट्रो गाडय़ांमधील स्क्रीन्स, एसटी व बसेस, रुग्णालये-दवाखाने-देवस्थानांमधील स्क्रीन्स, डिजिटल साईन बोर्ड
37 कोटी 55 लाख रुपये
सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, एसएमएस
5 कोटी रुपये