लोकलमध्ये लुटमार हा भयानक गुन्हा! कोर्टाचे निरीक्षण, तिघांना तुरुंगवास

लोकल ट्रेनमध्ये दिवसाढवळय़ा प्रवाशांना लुटणे हा भयानक गुन्हा आहे, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले आणि प्रवाशाला लुटणाऱया तिघांना तुरुंगवास ठोठावला. 12 मे 2021 रोजी मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. न्यायालयाने तिघा लुटारूंपैकी दोघांना सात वर्षे, तर आरोपी महिलेला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांनी हा निकाल दिला. तक्रारदार प्रवासी सकाळी 10.15 च्या सुमारास करी रोडवरून लोकलने सीएसएमटीला चालला होता. सिग्नलमुळे लोकल सीएसएमटीजवळ थांबली होती. यादरम्यान वेळ विचारण्याचा बहाणा करत एकजण पुढे आला व त्याने झटापट केली, तर दुसऱया लुटारूने चाकूचा धाक दाखवत सोन्याची चेन हिसकावली. नंतर टोळीतील महिलेने तक्रारदाराच्या खिशातील 5660 रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. लोकलमध्ये वारंवार घडणाऱया अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने तिन्ही आरोपींना तुरुंगवास ठोठावला. आसिफ शेख व अब्दुल सय्यद या दोघांना सात वर्षे, तर शेरबानू खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.