महाराष्ट्रातला तरूण हे पाहतोय आणि लक्षात ठेवतोय, वाढत्या बेरोजगारीवरून आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी वाढत्या बेरोजगारीवरून राज्य सरकारला फटकारले आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई) ताज्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये 10.05 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्याबाबत ट्विट करत राज्य सरकारवर आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई) ताज्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये 10.05 टक्क्यांवर पोहोचले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे आकडेही चिंताजनक आहेत. कृषीप्रधान देश म्हटल्या जाणाऱ्या भारतात ह्या वर्षी पाऊस कमी आणि अनियमित पडल्याने शेतीशी संबंधित उद्योगांमधे बेरोजगारी अधिक वाढण्याची शक्यता आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस असे अनेक मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारमुळे गुजरातला हलविण्यात आले. त्यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”महाराष्ट्रातला तरूणही बेरोजगारीने त्रस्त आहे. त्याला रोजगाराच्या संधींची गरज आहे. पण मिंधे-भाजपा सरकार मात्र उद्योगधंदे परराज्यात पाठवून, इथे नुसतीच जाहिरातबाजी करण्यात आणि द्वेषाचं राजकारण खेळण्यात मग्न आहे. महाराष्ट्रातला तरूण हे नक्की पाहतोय आणि लक्षात ठेवतोय. महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या तरूणांसाठी शाश्वत व मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्यात जास्त तरूण लोकसंख्या असलेल्या भारताचं प्रचंड नुकसान होईलच, पण कोट्यावधी कुटुंबांची वाताहत होईल”, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.