बीडच्या सभेत 23 डिसेंबरला मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आरक्षण आणि आपल्या समाजाला दिलेल्या आश्वासनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधीमंडळात भूमिका जाहीर करणार आहेत. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू, अशी घोषणा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच 24 डिसेंबर नंतर उपोषण नको, भेट भूमिका घ्या, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे समाज बांधवांच्या मागणीनुसार भूमिका जाहीर करू, असे आश्वासनही मनोज जरांगे पाटील यांनी दिले.

अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देवून आरक्षण देण्यासाठी शासनाला दिलेली 24 डिसेंबर हीच डेडलाईन आहे. त्यात आता बदल होणार नाही. आजवर 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे, सापडलेल्या नोंदींना कोठेही चॅलेंज होणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

या नोंदीचा आधार घेत शासनाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, नोकरभरतीसाठी पात्र असलेल्या 13 हजार मराठा युवकांना नियुक्त्या द्याव्यात, आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नये आणि केलीच तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून करावी, सर्व देवस्थानाकडील नोंदी, राजस्थानातील भाट लोकांकडील नोंदी, देवीच्या लस दिल्यानंतर घेतलेल्या नोंदी, टीसीवरील नोंदी शासकीय अभिलेखे म्हणून त्याची नोंद घ्यावी, आई ओबीसी- वडील मराठा असतील तर पोराला दोघांच्या जाती लावाव्यात यासह इतर मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या. मराठा आरक्षणाची लढाई विचाराने, ताकदीने आणि युक्तीने लढायची आहे. कोणीही उद्रेक करू नका, शांततेत मोठी ताकद आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिकाही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.

विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची भूमिका सोमवारी मांडणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या पुढील आंदोलनाची दिशा आज जाहीर करायची नाही. गनीमिकाव्याने लढायचे, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधीमंडळात सोमवारी कोणती भूमिका मांडणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. समाज बांधवांशी संवाद साधून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर केली. जरांगे यांनी आंदोलनाची दिशा ठरवण्यापूर्वी उपस्थित मराठा समाजाला विचारुनच निर्णय घेतला. त्यानुसार, आता 23 डिसेंबर रोजी पुढील घोषणा होणार आहे.

आम्हाला जे करायचंय ते परफेक्ट करायचं आहे. आम्हाला दमायचं नाही, कारण हा शेवटचा लढा आहे. केवळ पळायचं म्हणून पळायचं नाही. आम्ही करोडोंच्या संख्येनं आंदोलन करू, कारण आमची संख्याच तेवढी आहे. आमची संख्याच या राज्यात 50 ते 55 टक्के आहे. राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या, ज्या गेल्या 70 वर्षात सापडल्या नाहीत. हे मराठ्यांचं यश आहे. आता आम्ही कायद्याच्या चौकटीत बसलो आहोत. त्यामुळे, आम्ही ओबीसी आरक्षणात बसल्यामुळे सरकारचा सूर बदलला आहे. सरकारला आम्ही दिलेला वेळ पुरसा आहे, त्यांच्याकडे आणखी 8 दिवस आहेत.