…तर 6 जूनपासून पुन्हा उपोषण सुरू करणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मराठा समाज लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही. तसेच मराठा आंदोलनाविरोधात असणाऱ्या नेत्यांना मतदानही करणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी सरकारला मोठा इशाराही दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर पुन्हा 6 जूनपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. तसेच आता मराठा समाज विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. जरांगे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही राजकारणात नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही उमेदवार दिला नाही किंवा कोणाला पाठिंबा दिला नाही. मात्र मराठा समाजाला 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिले तर पुन्हा उपोषण करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले आहे. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने उलटले आहे. तरीही आमच्या समाजाला आरक्षण मिळालेले नाही. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आंदोलकांवर गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी त्यांची कामगिरी आहे, अशी खरमरीत टीकाही जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आमचे आरक्षण घटनेच्या चौकटीत टिकण्यासारखे आहे. मराठा कुणबी असल्याच्या नोंदी 200 वर्षांपूर्वीच्याही उपलब्ध झाल्या आहे. तसेच सरकारने आरक्षणासाठी समिती नेमली होती. घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ यांचाही सल्ला घेतला होता. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देत ते कायद्याच्या चौकटीत टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. आम्ही 200 वर्षापूर्वीच्याही नोंदी दिल्या आहेत. आता सरकारने 6 जूनपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.