महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी दावा केला होता. मात्र, उमेदवारी जाहीर होत नसल्याने अखेर त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली. या जागेचा तिढा सुटला नसलेलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जबरदस्त टोला लगावला आहे.

भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभे करेन असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी फक्त बीडमध्ये लक्ष द्यावे, असे सुनावले.

महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा, भुजबळांनी जागेवर केलेला दावा, त्यानंतर घेतलेली माघार आणि आता पंकजा मुंडे यांच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया यावरून जयंत पाटील यांनी भुजबळांना जबरदस्त टोला लगावला आहे. महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आमच्याशी भुजबळांची काही चर्चा झालेली नाही. मात्र, तिकडे त्यांची खूप अवहेलना होत आहे, त्यांची काळजी वाटते, असा टोला जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना लगावला.