पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा; मुख्यमंत्रीपदाबाबत विनोड तावडे यांचे वक्तव्य

राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपने धक्कातंत्र वापरत, जुन्या चेहऱ्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. महाराष्ट्रातही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर भाजप हाच प्रयोग करणार का, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आत्ताच सांगितले पाहिजे की नंतर बोलले तर चालेल, असे सांगत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री बनवणार का? असा सवाल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर विनोद तावडे म्हणाले, हे माझ्याच हातात आहे. पण, मी मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न तुम्हांला का पडत नाही. तुम्हाला पंकजा मुंडे यांची काळजी पडली का? केव्हातरी माझीही काळजी करा, असेही ते म्हणाले. भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेकदा पंकजा मुंडे यांनीही नाराजी उघड केली आहे. त्यामुळे तावडे यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाल्यावर शिवसेना आमच्यासोबत आली असती तर अजित पवार यांना सोबत घेतले नसते,असे विधानही विनोद तावडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीतील घटकांसोबत निवडणुकीत उतरणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे लक्ष्य लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असेही तावडे म्हणाले.