Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा गुढीपाडवा गोड झाला, शुभ मुहूर्तावर जागावाटपाची घोषणा

महाविकास आघाडीचा गुढीपाडवा आज गोड झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आज संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. त्यानुसार शिवसेना सर्वाधिक 21 जागा, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा लढवणार आहे. कोणत्या जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती यावेळी देण्यात आली. मुंबईतील सहापैकी चार जागा शिवसेना तर दोन जागा कॉंग्रेसच्या वाटय़ाला आल्या आहेत.

मुंबईतील शिवसेनेच्या शिवालय या राज्य संपर्क कार्यालयामध्ये ही संयुक्त पत्रकार परिषद आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या प्रमुख नेत्यांसह शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पार्टीचे रईस शेख, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, कॉम्रेड ढवळे, समाजवादी गणराज्य पार्टीचे कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे आदी घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी शिवालयाच्या वास्तूमध्ये सर्वांचे स्वागत केले आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी उपस्थित नेत्यांचा परिचय करून दिला. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होत असून आजचे वातावरण प्रसन्न आहे, नाना पटोले यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांचे चेहरे आनंदी आहेत आणि शरद पवार यांचाही चेहरा प्रसन्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. अत्यंत खेळीमेळीने आणि सहजरित्या जागा वाटप झाल्याचे सांगत संजय राऊत यांनी जागांची सविस्तर माहिती दिली.

जागावाटप एकमताने : पवार

महाविकास आघाडीमध्ये आता एकाही जागेवर मतभेद नाहीत. आज जाहीर केलेल्या जागा अंतिम असतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पवार यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. आपण अनेक पंतप्रधान पाहिले पण बेजबाबदार पंतप्रधान कसा असतो त्याचे दर्शन मोदींनी घडवले, असे पवार म्हणाले.

शिवसेना

– दक्षिण मुंबई , दक्षिण मध्य मुंबई , उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, ठाणे
– कल्याण, पालघर , रायगड , मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव
– शिर्डी , परभणी , धाराशी, बुलढाणा,, हातकणंगले , छत्रपती संभाजीनगर
– सांगली , हिंगोली, यवतमाळ-वाशीम

काँग्रेस

– उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई
– नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती
– नागपूर , गडचिरोली चिमूर , चंद्रपूर
– भंडारा गोंदिया, नांदेड, जालना, पुणे
– लातूर, सोलापूर, कोल्हापूर , रामटेक

राष्ट्रवादी

— बारामती, शिरुर
– सातारा, भिवंडी
– दिंडोरी, माढा
– रावेर, वर्धा
– नगर दक्षिण , बीड