फास्टॅग रजिट्रेशनच्या नावाने फसवणूक, लिंक पाठवून मोबाईल केला हॅक

फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्यासाठी इंटरनेटवर सर्च करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर मिळालेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी कॉल केल्यानंतर ते सायबर भामटय़ांच्या जाळ्यात सापडले. आरोपींनी शिताफीने त्यांना एक लिंक पाठवून त्यांचा मोबाईल हॅक केला. मग त्या व्यक्तीच्या मोबाईलमधील यूपीएच्या आधारे जवळपास एक लाख वळते करून घेतले. आरोपींनी डोपं लढवून गुन्हा केला, पण मलबार हिल पोलिसांनी नोएडा येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

डोंबिवली येथे राहणारे मंगेश चव्हाण (47) हे मलबार हिल येथे एके ठिकाणी चालकाचे काम करतात. त्यांना फास्टॅगचे रजिस्ट्रेशन करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. तेथे त्यांना एक नंबर मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता चव्हाण यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली. त्या लिंकवर क्लिककरून चव्हाण यांनी तेथे विचारलेली सर्व माहिती भरली. त्यानंतर आरोपींनी लिंकच्या माध्यमातून चव्हाण यांचा मोबाईल हॅक केला. मग मोबाईलमधील यूपीआयच्या माध्यमातून 99 हजार 980 रुपये दुसऱया बँक खात्यावर वळते करून घेतले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी मलबार हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच शिंदे, धारवाडकर, कदम व मुन्ना सिंह यांच्या पथकाने तपास सुरू केला. गुन्हय़ाच्या तांत्रिक तपासावरून आरोपी नोएडा येथील असल्याचे निष्पन्न होताच पथकाने नोएडा गाठले व तेथे बसून देशातील विविध नागरिकांना आर्थिक चुना लावणाऱया विक्रम सिंग (29) या भामटय़ाच्या मुसक्या आवळल्या. विक्रमकडून मोबाईल, विविध पंपन्यांचे सीम कार्ड, विविध बँकांचे एटीएम व व्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. त्याने अजून कोणाची फसवणूक केली याचा मलबार हिल पोलीस तपास करीत आहेत.