पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप, गळा चिरून केली होती हत्या

मोबाईलवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाने त्याच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी राहूल सुरेश भोसले(33) यास पत्नीस ठार मारल्या प्रकरणी दोषी धरले आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.

आरोपी राहूल सुरेश भोसले याने 22 ऑक्टोबर 2021 रोजी पत्नी दिपाली सुरेश भोसले हिस भेटण्यासाठी साईनाथ कलेक्शन सिध्दटेक रोड , राशिन येथे आला होता. आरोपीने पत्नी दिपाली हिच्याकडे मोबाईल मागिताला परंतु तिच्याकडे त्याचा मोबाईल नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राहूलने त्याच्या जवळील चाकुने पत्नी दिपालीच्या गळ्यावर वार करुन तिस जखमी केले. दिपालीची बहिण तिला वाचवायला गेली त्यावेळी त्याने तिच्याही कपाळावर डोळ्याच्या बाजुला वार केला. या हल्ल्यात दिपालीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरोधात कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखलव करण्यात आला.

मयत दिपाली व आरोपी राहुल यांना 1 मुलगा व 1 मुलगी अशी दोन अपत्य आहेत. मयत दिपाली ही जुन २०२१ मध्ये माहेरी आली होती व तिने आरोपी राहुल विरुध्द भरोसा सेल कर्जत येथे शाररिक व मानसिक छळाची तक्रार दिलेली होती व त्या वरुन आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला छळा बाबतचा गुन्हा दाखल झालेला होता.

सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश . मुजीब . एस . शेख , यांच्या न्यायालयात झाली . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले . त्यामध्ये फिर्यादी , साक्षीदार , वैद्यकीय अधिकरी , तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता संगिता अनिल ढगे यांनी काम पाहिले . न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी अभियोक्ताचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा . न्यायालयाने आरोपींना वरील प्रमाणे शिक्षा सुनावली . पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले .