मणिपूरमध्ये जमावाची भाजप आमदाराला बेदम मारहाण, विजेचे शॉक दिल्याने अर्धांगवायूचा झटका आला

मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारात लोकांनी तेथील लोकप्रतिनिधींना देखील लक्ष्य केले आहे. अनेक आमदार तसेच मंत्र्यांची घरे जाळल्याचे प्रकार मणिपूरमध्ये घडले आहेत. मणिपूरमधील भाजपचे आमदार विंगजगिन वाल्टे आणि त्यांच्या कुटुंबावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांची भेट घेऊन ते सचिवालयात परतत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. वाल्टे कुकी समाजाचे आहेत. जमावाने त्यांना मारहाण केली तसेच त्यांना ‘इलेकट्रीक शॉक’ दिला. त्यांच्यावर एवढा अत्याचार करण्यात आला की त्यांची स्मरणशक्ती गेली आणि त्यांचे अवयव नीट काम करत नव्हते. विजेचा धक्का आणि मारहाणीमुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका देखील आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने विमानाने दिल्लीला नेण्यात आले. आता दिल्लीतच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान आता हे 60 वर्षीय भाजप आमदार कालकाजी एक्स्टेंशनमध्ये भाड्याच्या घरात कुटुंबासह राहत आहेत. त्यांना नुकताच अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वालटे यांचा मुलगा जोसेफ याने सांगितले की, त्यादिवशी जमावाने मारहाण केल्यानंतर माझ्या वडिलांचे हात-पाय बांधले. यानंतर त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आले. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना विजेचे झटके देण्यास सुरुवात केली. यावेळी लोकांनी त्यांच्या चालकालाही मारहाण केली.

जोसेफने सांगितले की, त्यांच्या वडिलांच्या डोक्याला मार लागला त्यांना नीट बसताही येत नव्हते. शोक दिल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झाली होती आणि त्यांना नीट बोलताही येत नव्हते.

वाल्टे यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना विमानाने दिल्लीला नेण्यात आले मात्र त्यानंतर सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. जोपर्यंत मणिपूरमधील परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत ते राज्यात परतणार नसल्याचे मुलगा जोसेफने सांगितले. दुसरीकडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता वाल्टे यांनी पुन्हा निवडणूक लढवून विधानसभेत जावे, अशी त्यांची इच्छा नाही. हा प्रसंग झाल्यापासून त्यांना कोणताही मोठा नेता भेटायला आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

जोसेफ यांनी सांगितले की, “वडिलांवर करण्यात येणारे उपचार खूप महाग आहेत. आम्ही कसेबसे त्याने 60 ते 70 लाख रुपयांची व्यवस्था केली होती. मात्र उपचार किती काळ चालतील याबाबत काहीही सांगता येत नाही. शासनाकडूनही मदत मिळत नसल्याने कुटुंबाची अडचण होत आहे.”