आशियाई स्थापत्य वैभव – होर्यु-जी मंदिरातील खजिना

>> डॉ. मंजिरी भालेराव

होर्यु-जी मंदिर हे जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास, या विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

जपानमधील नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक. त्याची सविस्तर माहिती आपण गेल्या काही लेखांमधून पाहतो आहोत. या मंदिराच्या परिसरातील वास्तूंची माहिती पाहत असताना तिथे असलेली निरनिराळी सभागृहे, त्यामधील मूर्ती, चित्रे यांची माहिती आपण पहिली. जपानमधील सर्वात प्राचीन म्हणता येतील अशा बोधिसत्त्वांच्या लाकडी मूर्ती इथे मिळाल्या होत्या. या मूर्ती म्हणजे फक्त जपानसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी, विशेषत बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण होर्यु-जी मंदिर परिसरात मिळालेला खजिना इथेच संपत नाही. एक अतिशय आगळीवेगळी, एकमेवाद्वितीय अशी वस्तू या ठिकाणी मिळाली, ती म्हणजे एक लाकडी मंदिर. हे गौतम बुद्धासाठी केलेले तामामुशी मंदिर. हे छोटेसे लाकडी मंदिर साधारण 7 फूट उंचीचे आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात किंवा त्याधीच त्याची निर्मिती झाली असावी असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. अशा प्रकारचे हे पूर्व आशियातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याला तामामुशी मंदिर (तामामुशी नो झुशी) या नावाने ओळखले जाते. तामामुशी हे एका किडय़ाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर दोन खाली आणि दोन वर असे चार पंख असतात. त्यामध्ये वरचे पंख हे सप्तरंगी चमचमणारे असे असतात. या मंदिराच्या नावामध्ये या चमकदार पंख असलेल्या किडय़ाचे नाव आहे. कारण त्याच्या बाह्य बाजूवर हे पंख चिकटवले होते. एका चौरस पीठावर उभी असलेली हे एक लाकडाची छोटीशी इमारतच आहे. 233 सें. मी. (7 फूट 8 इंच) अशा उंचीचे हे मंदिर कला, स्थापत्य आणि त्याची ऐतिहासिकता यासाठी जपानच्या राष्ट्रीय खजिन्याचा एक भाग झाले आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांना व मौल्यवान वस्तूंना National Treasure of Japan असा दर्जा दिला जातो.

या तामामुशी मंदिराच्या बाबतीत केन्शिन नावाच्या एका भिक्षूने तेराव्या शतकात काही लिखाण करून ठेवले आहे. त्यानुसार हे मंदिर तामामुशी या नावाच्या एका किडय़ाच्या पंखांनी सजवले होते. ते मुळात राजकुमार शोतोकुच्या पत्नीची आई महाराणी सुइको हिचे होते. इसवी सनाच्या सातव्या शतकात बांधलेल्या मंदिरांच्या शैलीबद्दल स्पष्ट असे पुरावे बांधीव स्थापत्यात आज पहायला मिळत नाहीत. कारण अनेक मंदिरांची पुनर्बांधणी झाली, पण या मंदिरामुळे प्राचीन मंदिराचे संपूर्ण स्वरूप आणि स्थापत्य शैली आजही आपल्याला पहायला मिळते. या मंदिराच्या आतमध्ये कान्नोन (पद्मपाणी अवलोकितेश्वर) आणि बुद्धाच्या बसलेल्या अवस्थेतील ब्राँझच्या मूर्ती होत्या. याच्या चारही बाजूला चित्रे काढली होती. ती आजही पहायला मिळतात. त्यामध्ये समोरच्या बाजूला चार दिशांच्या लोकपालांपैकी दोन लोकपाल, तर बाजूच्या दोन दरवाजांवर कमळावर उभे असलेले दोन बोधिसत्त्व चित्रित केले आहेत. त्यांचे हात धर्मपाप्रवर्तनमुद्रा दर्शवणारे आहेत. यामधून ते जगातील सर्व जिवांना आश्वस्त करीत आहेत अशी कल्पना आहे. याशिवाय बौद्ध भिक्षू, काही आकाशात उडणारी दैवी व्यक्तिमत्त्वं, काही दैवी परिसर, उडणारी व्यक्तिमत्त्वं, काही प्राणी इत्यादीची चित्रेसुद्धा पहायला मिळतात. यातील काही प्रसंग हे निर्वाणसूत्र तसेच सुवर्णप्रभाससूत्र यामध्ये असलेल्या सूत्रांवर आधारित आहेत. या मंदिरामध्ये बुद्धाच्या तीन मूर्ती तसेच चार लोकपाल, हिंदू देवता लक्ष्मीसारखी समृद्धी देणारी देवता ‘किचिजोतेन’ यांच्याही मूर्ती आहेत. शोतोकु आजारी असताना या मूर्तींची निर्मिती करायला सुरुवात झाली, पण त्या पूर्ण व्हायच्या आत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अपामे अमिताभ आणि भैषज्यगुरूच्या मूर्ती याच काळात बनवल्या गेल्या. तोरी बुस्शी या सुप्रसिद्ध कलाकाराने या मूर्ती बनवल्या होत्या. शाक्यमुनी बुद्धाच्या बरोबर असलेल्या एका बोधिसत्त्वाच्या प्रभावळीवर एक कोरीव लेख आहे. त्यामध्ये ही सगळी माहिती दिली आहे.

जपान सरकारने सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा अनेक वस्तू या मंदिराच्या परिसरातून जमा केल्या आहेत, पण यापैकी जवळ जवळ तीनशेपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू आज टोकियो येथील पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयात आहेत. त्यामध्ये एका सिद्धम लिपीत ताडपत्रावर लिहिलेल्या संस्कृत हस्तलिखिताचाही समावेश होतो. अशा प्रकारे हे होर्यु-जी मंदिर जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास तसेच विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. जपानच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ‘निहोन शोकी’ या ग्रंथातील संदर्भ पडताळून पाहण्यासाठी, त्यांची सत्यासत्यता ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या भौतिक साधनांचा अपरंपार उपयोग होतो. जगाच्या इतिहासामध्ये इतक्या प्राचीन काळातील लाकडाच्या वास्तूंचे आणि वस्तूंचे फार थोडे पुरावे शिल्लक आहेत. त्यामुळे या सगळ्या खजिन्याची प्राचीनता आणि त्यांचे विविध प्रकार पाहता जपानच नव्हे, तर संपूर्ण जगाचा हा वारसा आहे असे म्हणता येईल.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

[email protected]