कडवट, कट्टर, स्वाभिमानी शिवसैनिकाला अखेरचा निरोप

14 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाने तमाम शिवसैनिक हळहळले. आपल्या लाडक्या सरांना, कडवट, कट्टर आणि स्वाभिमानी नेत्याला शिवसैनिकांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. माटुंग्यातील त्यांच्या घरापासून शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीपर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेदरम्यान अमर रहे अमर रहे, मनोहर जोशी अमर रहेच्या घोषणांनी आसमंत व्यापले.

मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी कळताच विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माटुंगा येथील घरी पोहोचले. राजकीय, शैक्षणिक, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मनोहर जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले व जोशी कुटुंबीयांना धीर दिला. त्यांच्या अंत्ययात्रेतही मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

मनोहर जोशी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, लीलाधर डाके, शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते – आमदार अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, संजय पोतनीस, विलास पोतनीस, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, उपनेते सचिन अहिर, पराग डाके, नितीन नांदगावकर, उपनेत्या सुषमा अंधारे, विश्वनाथ नेरुरकर, विभागप्रमुख महेश सावंत, आशीष चेंबूरकर, सुरेश पाटील, माजी महापौर महादेव देवळे, विशाखा राऊत, दत्ता दळवी, श्रद्धा जाधव, कामगार नेते बाबा कदम, ज्येष्ठ शिवसैनिक सु.ना. जोशी, काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे, संदीप देशपांडे, अमेय खोपकर, समीर भुजबळ, उद्योजक विठ्ठल कामत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन, आमदार कपिल पाटील, प्रवीण दरेकर, शंभुराज देसाई, मंगेश कुडाळकर, चंद्रकांत हंडोरे, कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, खासदार गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, भाजप नेते विनोद तावडे, गिरीश महाजन, मिलिंद देवरा, शिशिर शिंदे, विनोद खोपकर, सुरेश गंभीर, बाबा दळवी, दिगंबर कांडरकर, माजी नगरसेवक  सदानंद परब, सचिन पडवळ, राजन शिरोडकर, प्रवीण बर्वे, प्रवीण देव्हारे, द्वारकानाथ संझगिरी आदींनी श्रद्धांजली वाहिली.

मराठी भाषाभिमानी

मनोहर जोशी यांना मराठी भाषा आणि अस्मितेचा जबरदस्त अभिमान होता.    1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र झाला तरी महाराष्ट्रातील मंत्रालयाच्या प्रशासकीय कारभारात मराठी भाषेला प्राधान्य मिळाले नव्हते. राज्याचे प्रत्येक मुख्य सचिव मराठी भाषेत कामकाज करण्यासाठी मुदतवाढ मागत होते आणि दरवेळी ती मिळत होती. परंतु अशीच एक फाईल मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोर आली होती. ती त्यांनी अक्षरशः भिरकावून दिली. मुदतवाढ नव्हे तर संपूर्ण कामकाज मराठी भाषेत सुरू झालेच पाहिजे, असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर 1 मे 1995 पासून राज्याचा प्रशासकीय कारभार मराठी भाषेत सुरू झाला.

लोडशेडिंग केले बंद

युती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी राज्यात अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वीज भारनियमन केले जात होते. त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील लोकांना, हातमागधारकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना बसत होता. मनोहर जोशी यांनी ते भारनियमन बंद करून सर्वांना दिलासा दिला.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प

युती सरकारने 1 जानेवारी 1995 पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण दिले होते. वर्षानुवर्षे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचे हक्काचे पक्के घर मोफत मिळावे यासाठी युती सरकारच्या काळात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला. त्या प्रकल्पांतर्गत हजारो घरे बांधण्यात आली.

निराधारांसाठी वृद्धाश्रम

सरकारी योजना या सर्वसामान्यांसाठी असतात. पण युती सरकारच्या काळात एक योजना राबवताना मनोहर जोशी यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी संतापही व्यक्त केला होता. निराधार वृद्धांची वाढलेली संख्या पाहून राज्यात वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय युती सरकारला घ्यावा लागला होता. राज्यभरात वृद्धाश्रम सुरू करण्यात आले. तो निर्णय घेताना मनोहर जोशी यांनी वृद्ध मातापित्यांना घराबाहेर काढणाऱ्यांबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला होता. ते वृद्धाश्रम सुरू करताना मनोहर जोशी यांनी ‘वृद्ध मातापित्यांना घराबाहेर काढणारी ही कसली संस्कृती!’ अशी खंत बोलून दाखविली होती.

शिवसेना भवनाजवळ अंत्ययात्रा आली आणि…

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या शिवसेना भवनजवळ मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा दोन मिनिटे थांबवण्यात आली. शिवसैनिकांप्रमाणे जोशी यांच्या राजकीय जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या शिवसेना भवन आणि आशीर्वाद देणाऱ्या बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर अंत्ययात्रा आली असता वाहन थांबवून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली. दरम्यान, अंत्ययात्रेसाठी दादरमधील रस्त्याची एक मार्गिका मोकळी ठेवण्यात आली होती.

शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट शिवसैनिक

‘शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राभिमानी कडवट शिवसैनिकाला आपण मुकलो,’ अशा भावना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले की, मनोहर जोशी हे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी आणि प्रत्येक शिवसैनिकांसाठी ते आदर्श होते. अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते झुंझार होते, लढवय्ये होते. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. शिवसेनाप्रमुखांचे ते अत्यंत विश्वासू होते. सीमाप्रश्नी मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. त्यावेळी मनोहर जोशीही त्यांच्यासोबत होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी देशातील सर्व संसदीय पदांवर काम केले. त्याबद्दल ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले. ते उत्तम वत्ते, उत्तम अभ्यासक होते. त्यांचे वाचन उत्तम होते आणि मराठीबद्दल त्यांना कडवट अभिमान होता. ते यशस्वी उद्योजकही होते. मराठी माणसाने उद्योग व्यवसाय कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे. लोकसभा अध्यक्ष असताना पक्षपात न करता संसद कशी चालवावी हे त्यांनी त्या वेळी दाखवून दिले होते. राजकारणात वेळ पाळावी हा वक्तशीरपणा मनोहर जोशी यांच्याकडून शिकावा. बाळासाहेबांच्या सूचनेवरून त्यांनी मुख्यमंत्री असताना विस्थापित कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवल्या. अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनातही मनोहर जोशी यांचा सक्रिय सहभाग ‘होता. करसेवेसाठी ते प्रत्यक्ष उपस्थित होते याचे पुरावेही आहेत.

जनसेवेसाठी समर्पित

प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात मनोहर जोशींनी स्वतःला जनसेवेसाठी समर्पित केले होते. ते अनुभवी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व होते, अशा शोकभावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.

लोकशाही मूल्यांचे संवर्धन

मनोहर जोशी यांनी लोकसभेच्या अध्यक्षीय कारकीर्दीत लोकशाही मूल्ये समृद्ध करत काही उत्तम संसदीय मापदंड, परंपरा निर्माण केल्या होत्या. त्यांच्या निष्पक्षपाती कामकाज पद्धतीमुळे सर्वच नेते त्यांचा आदर करत असत, अशा भावना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केल्या.

त्यांचे योगदान आठवणीत राहील

माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान कायम आठवणीत राहील, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली.

राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व

कौशल्य शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण-तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे, अशा शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी श्रद्धांजली वाहिली.

राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरपला

सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला आहे, अशी हळहळ केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

राजकारणातील सर

महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या व्यासंगी नेत्याला महाराष्ट्र मुकला. सरांनी जिथे जिथे काम केले त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात नमूद केले.

महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला

दुःखद! महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आज पहाटे हरपला. शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल आज उद्या’ या पुस्तकात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्यही केले आहे, असा शोक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

निष्ठावंत सहकारी

शिवसेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी कायम शिवसेनाप्रमुखांसोबत राहिले. ‘शिवसेना-काल, आज, उद्या’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे शिवसेनेचा चालताबोलता इतिहास आहे. निष्ठावंत सहकारी आज सोडून गेले याचे अतिशय दुःख होत आहे, अशा शोकभावना शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केल्या.

आदर्शवत नेतृत्व

शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक, राजकारणातील आदर्शवत नेतृत्व आज हरपले. यामुळे समाजात आणि शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शिवसेना नेते, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केल्या.

धगधगता इतिहास पाहिलेले शिवसैनिक

अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

सुसंस्कृत, प्रगल्भ नेतृत्व

नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी पदे भूषविणाऱ्या सरांचं व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी होते, अशा भावना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.

धडाडीचा नेता

डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शासकीय इतमामात मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तीन वेळा फैरी झाडून मानवंदना दिली.