शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा मिंध्यांच्या कार्यक्रमावर मराठा समाजाचा बहिष्कार

मोठा गाजावाजा करून आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात आज मुख्यमंत्र्यांनी जुन्याच योजनांचा पाढा वाचला. यातही योजनांच्या माहितीचे वाचन कमी अन् राजकीय भाषणबाजीच जास्त केल्यामुळे गोरगरिबांचा मोठा हिरमोड झाला. त्यातच मराठा आरक्षणप्रश्नी चकवा देणार्‍या मिंध्यांच्या कार्यक्रमावर गावागावांतील मराठा समाजाने बहिष्कार टाकल्याने आयोजकांची मोठी फजिती झाल्याचे दिसले.

हिंगोलीतील रामलीला मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन आज रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचार्‍यांना गावागावांतील महिला बचत गटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आणण्याची सक्ती करण्यात आली होती. यासाठी जिल्हा नियोजन समितीrतून कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गावागावांतील लाभार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या 300 बसेस आणि 400 खासगी वाहने तैनात करण्यात आली होती.

मराठा समाजाने बसेस परत पाठवल्या

आज रविवारी भल्या पहाटेच एसटी महामंडळाच्या बसेस घेऊन गावागावांत दाखल झाले होते. मात्र, मराठा आरक्षणासाठी चकवा देणार्‍या मिंध्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे मराठा समाजाने गावागावांत सांगितले. त्यामुळे अनेक गावांतील मराठा समाजबांधवांनी बहिष्कार टाकून गावात आलेल्या बसगाड्या परत पाठवल्या.

लाभार्थी 4 तास ताटकळले

सकाळी 11 वाजतापासून शासकीय कर्मचार्‍यांनी हजारो लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणून बसवले होते. मात्र, दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन झाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी पाठ फिरवली. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्याच योजनांचे रटाळ वाचन केले. योजनांची माहिती कमी अन् राजकीय भाषणबाजीच जास्त केल्याने जिल्हा प्रशासनासह लाभार्थ्यांनाही हा कार्यक्रम नेमका कोणता आहे ? असा प्रश्न पडला होता.

अवघ्या 16 लाभार्थ्यांनाच प्रमाणपत्र

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केवळ 15-16 लाभार्थ्यांनाच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे हिंगोलीकरांकडून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोली जिल्हा नियोजन समितीचा करोडो रुपयांचा खर्च शासकीय कार्यक्रमासाठी झाला की, राजकीय कार्यक्रमासाठी? असा प्रश्नही हिंगोलीकरांनी उपस्थित केला.

लाभार्थ्यांसाठी लावणीचा कार्यक्रम

या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना सकाळी 11 वाजेपासून कार्यक्रमस्थळी आणून बसविण्यात आलेले लाभार्थी मंडप सोडून जाऊ नयेत यासाठी आयोजकांनी ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम सुरू केला. मुख्यमंत्री येईपर्यंत या कार्यक्रमाने लाभार्थ्यांना मंडपात थोपवून ठेवल्याचे पहायला मिळाले.

काळे झेंडे दाखविणारे शिवसैनिक ताब्यात

हिंगोली जिल्हा नियोजन समितीतून गावागावांत विकासकामांसाठी खर्च केला जाणारा करोडो रुपयांचा निधी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमावर केला जात असल्याने हिंगोली जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री येण्याअगोदरच पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उâर्फ गोपू पाटील यांच्यासह उपजिल्हा संघटक सोपान पाटील, रुपेश सूर्यवंशी, सुनील सावंत, विलास गांजरे, अतहर पठाण, इम्रान पठाण, शंकर सावंत, तौसिफ पठाण, भगवान सावंत, अनिल सावंत, दीपक सावंत, शेख निसार, बापूराव सावंत, अक्षय सावंत, नानू सावंत, राज सावंत, पिंटू देशमुख, शेख रहीम, साई सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन डोंगरकडा पोलीस चौकीत नजरवैâद केले होते. तरीही मुख्यमंत्री रामलीला मैदानाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर येताच शिवसैनिकांसह मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी तत्काळ शिवसेना सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे, जिल्हा संघटक बालासाहेब मगर, शेतकरी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वसीम देशमुख, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, शंकर घुगे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, शंकर घुगे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले.

कामगार कार्यालयासमोर हजारो लाभार्थ्यांचा गोंधळ

हिंगोली जिल्हा कामगार कार्यालयाकडून काही दिवसांपासून बांधकाम लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले जात आहे. मात्र, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांना साहित्यासाठी रविवारी रामलीला मैदानावर येण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्हाभरातील हजारो लाभार्थी रामलीला मैदानावर आले, मात्र, कामगार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सर्व लाभार्थी कामगार कार्यालयावर गेले. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी तुम्हाला कार्यक्रमातच साहित्य वाटप केले जाणार आहे. दिवसभर थांबा, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी आम्हाला येथेच साहित्य वाटप करा, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

पत्रकारांना पास दिलेच नाही

हिंगोली येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी सर्व पत्रकारांना पासेस देण्यासाठी त्यांचे पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड मागवून घेतले. मात्र, पत्रकारांना जिल्हा प्रशासन की पोलीस विभागाकडून पास द्यायचे, यावरून उडालेल्या गोंधळामुळे पत्रकारांना पास देण्यात आले नाहीत. यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकारांची धांदल उडाली.

बचत गटाच्या महिलांना तेराशे रुपये

कार्यक्रमासाठी येणार्‍या बचत गटांच्या महिलांना प्रत्येकी तेराशे रुपये वाटप करण्यात आल्याचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लाभार्थी महिला व तिच्या ओळखीच्या माणसाचा संवाद सुरू आहे. यामध्ये गावातील माणूस सगळ्या महिला कुठे निघाल्या आहे, असे विचारत आहे. तर महिला हिंगोलीला मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी जात आहोत. माणूस म्हणतो बायांसाठी काही आहे का ? असे विचारतो. त्यावर महिला बायांना पैसे देण्यात आले आहेत. माणूस म्हणतो किती ? महिला म्हणते तुमच्या घरी देण्यात आले आहेत. एका एका बाईला तेराशे रुपये देण्यात आले आहेत. असा संवाद असलेला ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.