सांगलीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळत चालले असताना सांगली जिल्ह्यातही सोमवारी आंदोलनाची तीव्रता वाढली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार-आमदारांसह लोकप्रतिनिधींनी लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, जिह्यातील बहुतांशी गावांमध्ये लाक्षणिक उपोषण, कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढण्यात आला.

सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नेत्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, डॉ. विश्वजीत कदम, अरुणअण्णा लाड, सुमन पाटील, विक्रमसिंह सावंत यांच्यासह माजी आमदार सदाशिव पाटील, नितीन शिंदे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, अविनाश पाटील, सुशांत खाडे, देवराज पाटील, मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर, प्रभाकर पाटील यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. मराठा समाजातर्फे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, अमोल गोटखिंडे, राजकुमार चव्हाण आदी सहभागी झाले.

मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत लोकप्रतिनिधींना धारेवर धरत मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, अशी मागणी केली होती. त्यावर नेत्यांनी लाक्षणिक उपोषण करू आणि एक दिवसाच्या अधिवेशनाची मागणी करू, असे सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनात हजेरी लावली.

जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता

सांगली जिह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीक्रता सोमवारी वाढली. ईश्वरपूर, तासगावात कॅण्डल मार्च, विटा येथे प्रशासकीय इमारतीवर चढून ‘शोले’स्टाइल आंदोलन, येलूर, दूधगाव, आष्टा, कवठेपिरान, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, पलूससह शंभरहून अधिक गावांमध्ये लाक्षणिक उपोषणासह अन्य मार्गाने आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध केला.

ईश्वरपुरात रॅली आणि उपोषण

मराठा आंदोलनाला वाळवा तालुक्यात पाठिंबा वाढत आहे. आज मराठा समाजाने शहरातून रॅली काढली. तसेच मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने ईश्वरपूर येथील तहसील कार्यालयासमोर बी. जी. पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.