मराठा आरक्षणावरून विधिमंडळात घमासान, राज्यात तुम्हाला काय घडवायचे आहे; भास्कर जाधवांचा भुजबळांना थेट प्रश्न 

तुम्ही राज्याचे वरिष्ठ मंत्री आहात, आयुष्यभर सत्तेत आहात. तुम्हाला राज्यात काय घडवायचे आहे, फक्त तुम्हीच सभागृहात एकांगी भाषण केलेत, अशा शब्दात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी थेट छगन भुजबळ यांचे नाव घेत हल्ला केला. मराठा समाजाची आजची अवस्था म्हणजे सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची ठोस भूमिका त्यांनी मांडली.

विधानसभेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज सलग दुसऱ्या दिवशी प्रदीर्घ चर्चा  झाली. यामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या सदस्यांनी आरक्षणावर भूमिका मांडली. मात्र भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली. कोकणात जमीन कोणाला जास्त नाही. मग मराठय़ांना उत्पादनाचं साधन काय आहे? आम्ही रयतेचे राजे, जहागीरदार म्हणून मिरवत राहिलो, मात्र पुढचं भविष्य अंधःकारमय करून ठेवले. मराठा समाजाची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.

छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत भास्कर जाधव म्हणाले की, आज भुजबळ बोलत आहेत, मात्र त्यांची आणि फडणवीस यांची काय जुगलबंदी झाली त्याचा प्रत्येक शब्द मी आणला आहे. संशयाची सुई कोण फिरवत आहे? एकांगी भाषण हे फक्त भुजबळ यांचे झाले. नाव घेऊन सांगतो. आयुष्यभर तुम्ही सरकारमध्ये आहात, वरिष्ठ मंत्री आहात. काय, घडवायचे काय या महाराष्ट्रात? राज्यात नऊ जातीय दंगली झाल्या. शाहू महाराज यांच्या कोल्हापूरमध्ये दंगली झाल्या याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.

महाराजांच्या पायाला हात लावून आश्वासन दिलेय, मग सांगा मराठय़ांना कसे आरक्षण देणार?

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर विधान परिषदेमध्येही आज चर्चा झाली. या वेळी शिवसेना आमदार अनिल परब यांनी लोकांना संभ्रमात ठेवणाऱ्या मिंधे सरकारच्या भूमिकेवर प्रहार केला. लोकांना झुलवत का ठेवता? आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घ्या, असे अनिल परब म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून आश्वासन दिलेय की मराठा समाजाला आरक्षण देणार. आम्ही त्याचा आदर करतो. पण ते आरक्षण कसे मिळणार आहे हेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे परब म्हणाले.

सरकार म्हणतेय, मराठा समाजाला आरक्षण देणार. मग कसे देणार हे स्पष्ट करा. त्यासाठीच ही चर्चा आहे, असे परब म्हणाले. आरक्षणातील टक्केवारीची मर्यादा बदलण्याचा अधिकार पेंद्र सरकारला आहे की राज्य सरकारला, असा सवाल करतानाच, राज्य सरकारला तो अधिकार नसेल तर आपण कशासाठी इथे चर्चा करतोय, असा संतापही अनिल परब यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणावर आता एकच पर्याय आहे. आपण सर्वांनी मिळून पंतप्रधानांकडे जायला हवे. हा प्रश्न सर्व राज्यांचा असल्याने घटनादुरुस्ती करून आरक्षणासाठी टक्केवारीची मर्यादा वाढवा असे त्यांना सांगायला हवे, अशी सूचनाही अनिल परब यांनी केली.

छगन भुजबळ काय म्हणाले…

मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला देत म्हणाले की, जरांगे पाटील म्हणतात, माझा कार्यक्रम केला जाणार आहे. मला गोळी मारली जाऊ शकते असा खळबळजनक दावा मंत्री छनग भुजबळ यांनी या विषयावर बोलताना केला.  त्यासाठी त्यांनी पोलिसांच्या रिपोर्टचाही दाखला दिला.  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे, मग फक्त भुजबळच टार्गेट का असा सवाल त्यांनी केला. यातून छगन भुजबळ मराठा समाजाचा विरोधक असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली.