ओबीसीतून मराठय़ांना आरक्षण देऊ नका! छगन भुजबळ यांचा आपल्याच सरकारवर हल्ला

मराठा आरक्षणावरून मिंधे सरकारमध्येच जुंपल्याचे चित्र आज सोमवारी समोर आले. आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही, परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आम्ही प्राणपणाने विरोध करू, असा हल्लाबोल करत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले. कुणबी सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेली न्या. शिंदे समितीही अमान्य असल्याचे भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन माजी न्यायमूर्तींच्या वर्तनावरही त्यांनी आक्षेप घेतला.

बीड, माजलगाव येथे झालेल्या जाळपोळीची पाहणी केल्यानंतर छगन भुजबळ यांनी आज सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भुजबळ म्हणाले, ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांना आरक्षण मिळावे, परंतु ज्याची नोंद सापडली आहे त्यांच्या नातलगांनाही प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे.

हिंसा करणारे तुमची नाहीत, मग गुन्हे मागे कशासाठी?

बीडसह इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण सगळे गुन्हे माफ करण्यात आले. जाळपोळ करणारी आमची माणसे नाहीत, असा दावा मनोज जरांगे करतात. सरकारनेच जाळपोळ केली, असेही त्यांचे म्हणणे आहे. तुमची माणसे नाहीत मग गुन्हे मागे घेण्याची मागणी कशाला करता, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला. सरकारने शेतकऱयांना जशी मदत केली तशीच या हिंसाचारात नुकसान झालेल्यांनाही भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

अचानक 11 हजार नोंदी कुठून आल्या

अगोदर ‘कुणबी’ असा उल्लेख असलेल्या पाच हजार नोंदी सापडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्या. शिंदे समितीने तेलंगणात निवडणूक असल्यामुळे कागदपत्रे मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर 48 तासांत 11 हजार कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे कोठून आली? त्यात पुन्हा हजारोंची भर पडत गेली. आता तर सरसकट प्रमाणपत्राचे दुकानच उघडण्यात आले आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली. पुढचे दार सर्वोच्च न्यायालयाने बंद केले आहे. तुम्ही मागच्या दाराने येत आहात. आरक्षण टिकले तर घ्या. त्याला आमचा विरोध नाही, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती जीव वाचवायला आले होते, तुम्ही तर जीवच घ्यायला निघालात!

आपण कुणालाही भेटलो तर नमस्कार करतो. न्यायमूर्तींनीही तेच केले.  मुळात ते जीव वाचवायला आले होते, तुम्ही तर जीवच घ्यायला निघालात, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला.

मराठवाडय़ाच्या दौऱयावर असलेल्या भुजबळ  यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. भुजबळ खालच्या स्तरावर जाऊन बोलत आहेत. न्यायमूर्ती आंतरवालीत जीव वाचविण्यासाठी आले होते, त्यांनी तेथे न्यायदानाचेच काम केले. तुम्ही तर कुणाचा जीव वाचवायला तयार नाहीत. तुम्ही हल्ला करून जीवच घ्यायला निघाला आहात, असा पलटवार जरांगे यांनी केला.

लाठीहल्ल्याचे सत्य समोर येऊ द्या

आंतरवालीत झालेल्या लाठीहल्ल्याचे सत्यही लोकांसमोर आणले पाहिजे, आमच्यावर कुणी हल्ला केला ते उघड झाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. बडतर्फ पोलीस अधीक्षक सगळे घडून गेल्यावर बोलत आहेत. पूर्वनियोजित काय होते याची चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हानही या वेळी त्यांनी दिले.

शांततेत आंदोलन करणारांवर गुन्हे कशासाठी?

बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आम्ही समर्थन करत नाही. आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. शांततेत आंदोलन करणाऱया मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले जात आहेत. हे गुन्हे मागे घ्या, अशी आमची मागणी आहे. परंतु आरक्षण देणे जिवावर आल्यानेच हा केविलवाणा रडीचा डाव खेळण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.