पाणी नेण्याचे धाडस करू नका, सुळकुड योजना रद्द ही काळ्या दगडावरची रेष!

दूधगंगेतून (काळम्मावाडी) इचलकरंजीच्या सुळकुड नळपाणी योजनेस कागलमधील लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा एकमुखाने विरोध दर्शविला आहे. ‘सुळकुड येथून पाणी नेण्याचे धाडस करू नये. सुळकुड पाणी योजना रद्द, ही आता काळ्या दगडावरची रेष आहे,’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज इचलकरंजीकरांना सुनावले. जिह्याचे नेते म्हणून मुश्रीफ यावर काहीतरी तोडगा काढतील, अशी अपेक्षा असणाऱया इचलकरंजीकरांनाच मुश्रीफ यांनी डिवचणारे वक्तव्य केल्याने या योजनेवरून आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

दूधगंगेतून इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्याला कागल तालुक्यातील शेतकऱयांकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुश्रीफ यांनी सुळकुड पाणी योजना रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन आदेश काढावे लागतील. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यंदा पाऊस लांबल्याने कागल तालुक्यातील शेतकऱयांच्या उसाला पाणी मिळाले नाही. सुळकुड नळपाणी योजनेमुळे शेतकऱयांचे नुकसान होणार असल्याने इचलकरंजीकरांनी सुळकुडमधून पाणी नेण्याऐवजी वारणा आणि कृष्णा नदीचा पर्यायी विचार करावा, असा सल्लाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

सत्तेचा हट्ट चालू देणार नसल्याचा टोला माजी आमदार संजय घाटगे यांनी खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांना लगाविला, तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही या योजनेवर मोठा निधी खर्च होणार असल्याने कृष्णेतून पाणी नेल्यास खर्च वाचणार आहे. इचलकरंजीकर सांगत आहेत त्यापेक्षा जादा पाणी लागणार असल्याने भविष्यातील धोका ओळखून विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे योजना रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही घाटगे यांनी सांगितले.

दरम्यान, सुळकुड योजना रद्द करण्याबरोबरच सुरू असलेले काम तत्काळ थांबविण्याची मागणी ग्रामस्थांनी या बैठकीत केली. यावर या योजनेचे कोणतेही काम सुरू झाले नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह कागल तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.