अशोक चव्हाणांच्या सभेसाठी मराठा आंदोलकांना डांबले! अर्धापुरात पोलिसांची मिंधेगिरी

भाजपचे ‘आदर्श डीलर’ खासदार अशोक चव्हाण यांना होणाऱया मराठा आंदोलकांच्या विरोधाचा पोलिसांनी भलताच धसका घेतला. चव्हाणांची पिंपळगाव येथील सभा निर्धोक होण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी चक्क मराठा आंदोलकांना दिवसभर पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. पोलिसी मोगलाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी चव्हाणांच्या सभेकडे पाठ फिरवली. त्यामुळे सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाजपचे गुणगान गाण्याची वेळ अशोक चव्हाणांवर आली.

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे ग्रामस्थांनी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याची सभा होऊ देणार नाही, असा ठराव केला आहे. याच पिंपळगावमध्ये सोमवारी अशोक चव्हाणांची सभा ठेवण्यात आली होती. सभेच्या 48 तास अगोदर अर्धापूर पोलिसांनी गावातील 30 ते 35 मराठा आंदोलकांना कलम 149 अन्वये स्थानबद्धतेची नोटीस बजावली. त्यानंतर कलम 111 अन्वये या सर्वांना अर्धापूर पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले. पोलिसांच्या या मिंधेगिरीवर रवि कल्याणकर, विठ्ठल कल्याणकर, बालासाहेब कल्याणकर आदींनी संताप व्यक्त केला. पोलिसांना हाताशी धरून, आम्हाला डांबून गावाच्या पिंवा आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असेही या आंदोलकांनी ठणकावून सांगितले.