पुन्हा कोरोनाचा धोका! रुग्णांनी गाठला 7 महिन्यांचा उच्चांक, आरोग्यमंत्र्यांकडून मॉक ड्रिलचे निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानमध्ये बुधवारी कोरोनाग्रस्तांच्या (कोविड-19) संख्येत वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 614 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 21 मे नंतर पहिल्यांदाच ही संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. केरळमध्ये आढळलेल्या कोविड-19 चा नवा व्हेरिएंट JN.1 मुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

24 तासांच्या कालावधीत केरळमधील तीन मृत्यूंसह मृतांची संख्या 5,33,321 इतकी नोंदवली गेली आहे. सकाळी 8 वाजता ही आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील कोविड प्रकरणांची संख्या 4.50 कोटी (4,50,05,978) आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 4,44,70,346 झाली आहे आणि राष्ट्रीय स्तराचा विचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.81 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या अध्यक्षांची बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी देशाच्या काही भागांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या वाढीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल, भारती पवार, आरोग्य सचिव सुधांश पंत, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ राजीव बहल आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल हे देखील या बैठकीला उपस्थित होते.