‘एमआयएम’चा शाहू महाराजांना पाठिंबा; महाविकास आघाडी कोल्हापुरात मजबूत

सर्वसमावेशकता, बहुजनहिताय त्याचबरोबर लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या महाविकास आघाडीला विविध पक्ष आणि सामाजिक संघटना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना एमआयएम पक्षाने आज पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आधीच कोल्हापुरातून भरभरून पाठिंबा मिळत असलेल्या शाहू महाराजांचे पारडे जड झाले आहे.

 केंद्र आणि राज्य सरकारची बहुजनहिताविरोधातली, लोकशाही आणि राज्यघटनेविरोधातली वाटचाल लक्षात घेऊन एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. आम्ही कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत, असे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एमआयएमच्या पाठिंब्याने शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे.

वंचितचाही शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार उभा केलेला नाही. वंचितने या जागेवर छत्रपती शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दलित तसेच बहुजनांचाही पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे.