मंत्री छगन भुजबळ यांना ध्वजारोहणाचा मान नाही, त्यांचे बळ कमी झालंय की कमी केलं जातंय; विजय वडेट्टीवार यांची टीका

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही. दोन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेल्या ज्येष्ठ ओबीसी मंत्र्याला महायुतीचे सरकार ध्वजारोहणाचा मान देत नाही. महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना केली जात आहे, अशी खरमरीत टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचे बळ कमी झालंय की, कमी केलं जातंय असा प्रश्न पडतो आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना दिलेली वागणूक गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून राज्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांना डावलणे हे काही नवीन नाही. या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचा वाटेला अशीच वागणूक येणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. ओबीसी मंत्री छगन भुजबळांचे सरकार मधील बळ किती आहे, हे आज राज्यातील जनतेला महायुती सरकारने दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारचे ओबीसी प्रेम हे ढोंगी आहे, हे यावरून स्पष्ट होते, असे खडेबोलही वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत.