लोकसभेला गळ्यात गळे घालणारे भाजप, मिंधे विधानसभेला एकमेकांची डोकी फोडतील!

भाजप, मिंधे, अजित पवार गटात सध्या जागावाटपावरून अनेक खलबत्ते सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. नवनवीन आकडे समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालणारे भाजप, मिंधे आणि अजित पवार यांचा गट विधानसभेच्या वेळी मात्र एकमेकांची डोकी फोडतील, असे जोरदार तडाखे मनसेचे कल्याण ग्रामीणमधील आमदार राजू पाटील यांनी लगावले आहेत.

डोंबिवलीच्या एकतानगरमधील एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राजू पाटील आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारले असता पाटील म्हणाले की, केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यानंतर जागावाटपावरून अनेक तर्कवितर्क खोके सरकारमधील नेते करीत असून रोज नवीन आकडे जाहीर होत आहेत. जागा वाटप करताना त्यांची चांगलीच दमछाक सुरू आहे. लोकसभा निवडणूक हे लोक कसेबसे निभावून नेतील. आता गळ्यात गळे घालणारे विधानसभेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांची डोकी फोडतील, असेही राजू पाटील यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात मोठा राजकीय गोंधळ उडाला असून कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुका अधिक मनोरंजित होण्याची शक्यता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. त्यांनी सांगितले, भाजप, मिंधे व अजित पवार गट यांच्यातच सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून जुंपली आहे. एकमेकांची उणीदुणी काढली जात असली तरी आम्ही एक आहोत, असे भासवले जात आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र या तिघांचाही भंडाफोड होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

गोळीबाराची घटना राजकीय चढाओढीतून

राज्यात सत्ताविरोधी वातावरण असून कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी कितीही कामे केली तरी लोकांचे पूर्ण समाधान होऊ शकत नाही, असे सांगतानाच राजू पाटील यांनी कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ही घटना राजकीय चढाओढीतून घडली असून त्याबाबत जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.