आजपासून विधिमंडळाचे वादळी अधिवेशन; कलंकित सरकारच्या चहापानावर बहिष्कार! विरोधकांची एकीची वज्रमूठ

शिंदे-फडणवीस सरकारला लोकमान्यता नाहीच, पण संविधानाचीही मान्यता नाही. सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या घटनाबाह्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. हे कलंकित सरकार आहे. त्यामुळे अशा कलंकित सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याची घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. विरोधकांच्या संख्याबळावर जाऊ नका. विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकसंध आहोत. या अधिवेशनात सरकारला पाणी पाजणारच, असा इशाराही त्यांनी दिला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या (सोमवार) पासून सुरू होत आहे. अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधान भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अमिन पटेल, अभिजित वंजारी, कपिल पाटील, विनोद निकोले व अन्य सदस्य उपस्थित होते.

या बैठकीनंतर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात, सुनील प्रभू, भाई जगताप, अभिजित वंजारी उपस्थित होते. यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, कांदा उत्पादकांना साडेतीनशे रुपये क्विंटल अनुदान जाहीर केले होते, पण ते मिळालेले नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले तेही अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विक्रम झालेला आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा
कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या झाली, एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या मुलीची राजगडावर हत्या झाली. पुण्यात कोयता गँगची दहशत आहे. नागपुरात गावठी कट्टे विकले जात आहेत. सरकारच जातीय दंगली घडवत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.

मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप
मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मित्तल टॉवरमध्ये बसून महसूल विभागाच्या बदल्यांचे आदेश जारी होतात. बदल्या व बढत्यांमध्ये भ्रष्टाचार आहे. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच कबूल केले आहे असे दानवे म्हणाले.

एका वर्षात सर्वाधिक आत्महत्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या. कुपोषणाचे बळी वाढले. बालमृत्यू व गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे म्हणाले.

सरकार आमदारांना सांभाळण्यात मश्गूल
राजकीय पक्षात फूट पाडून सरकार उभे आहे. पावसाने ओढ दिली आहे. दुबार पेरणीही होऊ शकत नाही. धरणांमधील पाणीसाठा 27 टक्क्यांवर आला आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. जाहीर झालेली मदत मिळालेली नाही. कर्जमाफीच्या केवळ घोषणा झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. महागाई वाढली आहे. जातीय दंगली होत आहेत. सहा महिन्यांत पाच हजारांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. सरकार खातेवाटप व आमदारांना सांभाळण्यात मश्गूल आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

शाहू-फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कलंकित
ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणेचा वापरू करून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. धनगर समाजाला सरकार आरक्षण देऊ शकलेले नाही. समृद्धी महामार्गावर अपघात वाढत आहेत, खारघर दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे या कलंकित सरकारच्या चहापानात आम्हाला स्वारस्य नसल्याने बहिष्कार घालत असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

गटनेता म्हणूनही मान्यता नाही
अंबादास दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून नाकारले आहे तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राजकीय पक्ष फोडून पक्षच पळवून नेण्याचे सुरू असलेले राजकारण पाहता राज्यात लोकशाहीचीच हत्या झालेली आहे.

फोडाफोडीत विकास मागे
सरकार विकासकामाच्या घोषणा करीत आहे, पण सरकार राजकारणात तल्लीन झालेले आहे. विकासकामांसाठी वेळ नाही. फोडाफोडीच्या राजकारणात राज्याचा विकास मागे पडल्याची खंत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेता कोण?
अजित पवार यांच्या बंडाळीमुळे विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता सर्वाधिक आहे. विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावाही केला असून उद्या अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षच त्याचा निर्णय देऊ शकतील.

विधानसभेत काँग्रेस दावा करणार – थोरात
काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने विधानसभेत विरोधी पक्षनेता आमचाच असेल, अशी भूमिका काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मांडली. थोरात म्हणाले की, काँग्रसेचे 45 आमदार असून विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष आता काँग्रेसच आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार आहोत. कोण विरोधी पक्षनेता होणार ते नाव दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलून अंतिम केले जाईल, असे ते म्हणाले.

जास्त आमदार त्यांनाच पद मिळावे – जयंत पाटील
ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. ‘आमच्याकडे 19 ते 20 आमदार आहेत. बरेच आमदार दोन्हीकडे असल्याचे दाखवत आहेत. आमदारांची संख्या पाहिली तर विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणे योग्य नाही. यासंदर्भात अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत योग्य निर्णय होईल.’, असे ते म्हणाले.