मुक्ताई धबधबा कोसळू लागला; विकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी

muktai-waterfall

चंद्रपूर जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. याच निसर्गाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे चिमूर तालुक्यातील मुक्ताई देवस्थान आणि तेथील धबधबा. पावसानं या भागात चांगली हजेरी लावल्यानंतर धबधबा वाहू लागला असून ‘विकेंड’ साजरा करणाऱ्या पर्यटकांनी सध्या हे पर्यटनस्थळ गजबजून गेलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वर्षाला सरासरी 1100 मिमी पर्जन्यमान होतं. जंगलानं वेढलेला हा जिल्हा असल्यानं हिरवाई चहूकडे पसरलेली आहे. अशा हिरव्या शालूतून एखादा ‘धवल प्रपात’ कोसळत असेल, तर पर्यटक कसे आकर्षित होणार नाही? असंच काहीसं चित्र चिमूर तालुक्यातील मुक्ताई इथं बघायला मिळतं आणि त्याकडे आकृष्ट होणारे रसिकही दिसतात.

सध्या पावसानं चांगली हजेरी लावली असून धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे. विकेंडला मुक्ताई धबधबा स्थळी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुक्ताई हे स्थान विदर्भातील माना जातसमूहाच्या मुक्ताबाई या दैवताच्या मंदिराचं स्थान. या गावी धबधबास्थळी मुक्ताबाईचं छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. घनदाट अरण्य आणि खडकाळ वाट तुडवल्यावर जंगलाच्या मध्यभागी असलेला खडकांच्या मधोमध असलेला धबधबा नजरेस पडतो.

या धबधब्याच्या आकर्षणापोटी विकेंडला चंद्रपूर, वर्धा आणि लगतच्या नागपूर जिल्ह्यातील युवा पर्यटक या पर्यटनस्थळी तोबा गर्दी करत आहेत, मुक्ताई हे नाव आता जिल्ह्यातील वर्षा पर्यटनस्थळांच्या यादीतील एक मोठं नाव झालं आहे.