मुलुंडच्या आगीत 50 जण बचावले, अग्निशमन दलाची जिगरबाज कामगिरी

मुलुंडमधील सहा मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या जिगरबाज कामगिरीमुळे 50 रहिवासी बचावले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत सहाव्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. यामुळे या आगीत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.

मुलुंड (पश्चिम), एल. बी. एस. मार्गावरील अविअर कॉर्पेरेट पार्क ही तळमजला अधिक सहा मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर सुमारे एक हजार चौ. फूट जागेत आज सकाळी 9.15 वाजता अचानक आग लागली. यामुळे घाबरलेल्या काही रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली तर 40 ते 50 जण सहाव्या मजल्यावर अडकले होते. यामुळे प्रचंड घबराट पसरली होती. आगीपासून वाचविण्यासाठी या सर्वांनी आरडाओरड सुरू केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. एकीकडे आग विझविण्याची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे या आगीत अडकलेल्या 50 जणांना इमारतीच्या जिन्याचा आणि अग्निशमन दलाच्या शिडीचा वापर करून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इमारतीमधून बाहेर आलेल्या नागरिकांनी सुटकेचा निŠश्वास सोडला.

म्हणूनच भडकली आग

या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, एसी, फर्निचर, ऑफिस रेकॉर्ड अशा सामानामुळे आग वेगाने भडकली. हे सामान आगीत जळून खाकही झाले. मात्र अग्निशमन दलाने काही अवधीत 4 फायर इंजिन, 2 जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अनिशमन दल आणि पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.