Video मुलुंडमध्ये गुजरात्यांची दादागिरी, मराठी माणसाला सोसायटीत गाळा नाकारला

मुंलुंडमधील शिवसदन सोसायटीतील गुजराती लोकांनी त्या सोसायटीत मराठी माणसाला घर किंवा गाळा दिला जात नसल्याचे मुजोरपणे सांगत दादागिरी केली आहे. तृप्ती सागर देवरुखकर ही महिला तिच्या पतीसह या सोसायटीत गाळा बघायला गेली होती. त्यावेळी तिचा तेथील सदस्यांशी वाद झाला. त्या वादानंतर त्यांनी त्या महिलेचा फोन हिसकावून घेतला व तिच्या नवऱ्याला धक्काबुक्की केली. तृप्ती यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

”मुलुंड वेस्टला शिवसदन सोसायटीत ऑफिससाठी जागा बघायला गेलो. तिथल्या सेक्रेटरीने सांगितलं की मराठी माणसांना त्या सोसायटीत जागा देत नाहीत असं सांगितलं. आम्ही कारण विचारलं त्यावर ते हमरीतुमरीवर आले. दादागिरी करू लागले. मराठी माणसाला जागा देत नाहीत मग आम्ही कुठे जाऊन राहायचं. गुजरातमध्ये जाऊन राहायचं का आम्ही. हे लोक सांगणार आम्ही कुठे राहायचं आणि कुठे नाही?”, अशा सब्दात तृप्ती यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

”भररस्त्यात आमचा वाद सुरू होता. हे सगळं रस्त्यावर चालू होतं त्यावेळी मी शूट करत होते. त्यांनी माझा फोन खेचून घेतला. मला मारलं, माझ्या नवऱ्याला मारलं. चष्मा तोडला त्याचा. त्यांची दोन तीन माणसं आली त्यांच्या मदतीला पण माझ्या मदतीला एकही मराठी माणूस आलेला नाही.” अशी खंत तृप्ती यांनी व्यक्त केली.