कोरोना आला! पालिका अ‍ॅलर्ट मोडवर

तब्बल अडीच वर्षे मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला वेठीस धरल्यानंतर पूर्ण नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘जीएन-1’ची एण्ट्री मुंबईच्या वेशीवर ठाण्यात झाल्याने पालिकाही ‘अलर्ट मोड’वर आली आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 34 बाधितांची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात येणार असून दररोज होणाऱया एक हजार चाचण्यांची संख्या आता वाढवण्यात येणार आहे. तर खबरदारी म्हणून 16 पालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स रुग्णालयासह सुमारे साडेपाच हजार बेड तैनात ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत मार्च 2020 मध्ये शिरकाव झालेल्या कोरोनाने अवघ्या काही दिवसांतच संपूर्ण मुंबईचा ताबा घेतल्याने ‘आणीबाणी’ची स्थिती निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन राज्य सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जीवघेण्या कोरोनाविरोधातील लढा यशस्वी झाला. मात्र सुमारे वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या कोरोना रोखण्यासाठीच्या व्यवस्थेची माहिती दिली. पालिकेच्या 16 रुग्णालये आणि सेव्हन हिल्स रुग्णालयासह एकूण 5505 बेडसह औषधे आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. गरज भासल्यास 114 खासगी रुग्णालयांमध्येही बेडची व्यवस्था करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा उपस्थित होत्या.

असा वाढतोय धोका

– मुंबईत गेल्या महिनाभरात दररोज एक हजार चाचण्या होत असून यामध्ये 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. 20 दिवसांत तिपटीने रुग्णवाढ झाली.
– चाचण्यांच्या प्रमाणात रुग्ण बाधित येण्याचे म्हणजेच पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 1.6 टक्के होते, मात्र आता हे प्रमाण 3.3 टक्के झाले आहे.

पालिकेची बेड व्यवस्था

आयसोलेशन 1276
ऑक्सिजन 1108
आयसीयू 441
व्हेंटिलेटर 470
एकूण 3295

सेव्हन हिल्स रुग्णालय

आयसोलेशन 910
ऑक्सिजन 620
आयसीयू 320
व्हेंटिलेटर 360
एकूण 2210

सध्या मास्क सक्ती नाही

मुंबईत अजूनही कोरोना रुग्णवाढ पूर्ण नियंत्रणात असल्यामुळे मास्क वापरण्याची सक्ती करणे तूर्तास तरी गरजेचे नाही. शिवाय सोशल डिस्टन्सिंग, सक्तीच्या चाचण्या किंवा एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर चाचण्या स्क्रिनिंग करण्यात येणार नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

घाबरू नका, काळजी घ्या

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

काय कराल..

– सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास मास्क वापरा.
– लक्षणे असलेल्यांनी शक्यतो कोरोना चाचणी करावी.
– कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस घ्यावा.
– सहव्याधी असणाऱयांनी विशेष काळजी घ्यावी.
– वारंवार हात धुवावेत, लक्षणे असलेल्यांचा संपर्क टाळा.
– लक्षणे असलेल्यांनी शक्यतो गर्दीत जाऊ नये.
– शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा.
– पॉझिटिव्ह असल्यास इतरांपासून विलग रहा.