मुंबईत मालमत्ता खरेदीचा विक्रम; वर्षभरात 1 लाख 11 हजारांहून अधिक व्यवहार

कोरोनाचे संकट असतानाही यंदाच्या वर्षी मुंबईत मालमत्ता खरेदी-विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 2021 मध्ये मुंबईत तब्बल 1 लाख 11 हजार 552 खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यवहारात 70 टक्क्यांची वाढ आहे तर कोरोना महामारीच्या आधी म्हणजेच 2019 या वर्षापेक्षा यंदा 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘नाइट फ्रँक’च्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत मालमत्ता खरेदीवर मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले होते. त्यामुळे 2021 मध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे ‘नाइट फ्रँक’ने म्हटले आहे. यापूर्वी 2018 मध्ये सर्वाधिक म्हणजे 80 हजार 746 मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले होते. यंदाच्या वर्षी इतर महिन्यांच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 9 हजार 320 व्यवहार झाले आहेत. डिसेंबरमध्ये झालेले व्यवहार हे मागील महिन्यांच्या तुलनेत 23 टक्क्यांनी अधिक आहेत. डिसेंबर 2021 मध्ये पहिल्या 20 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 293 खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी होत होत्या. त्यानंतरच्या 11 दिवसांमध्ये दिवसाला सरासरी 314 नोंदी होत होत्या.

वर्ष                मालमत्ता खरेदीविक्री

  • 2017                    68 हजार 659
  • 2018                     80 हजार 746
  • 2019                     67 हजार 683
  • 2020                      65 हजार 633
  • 2021                      1 लाख 11 हजार 552