रेल्वे प्रवाशांच्या नववर्षाची सुरुवात मेगाब्लॉकने, मध्य रेल्वेवर रविवारी माटुंगा-मुलुंड आणि वाशी-पनवेलदरम्यान ब्लॉक

मुंबईकरांची नवीन वर्षाची सुरुवात मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकने होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मध्य रेल्वेने रविवार वर्षाचा पहिला दिवस अतानाही आपल्या नियमित देखभाल-दुरुस्तीबरोबरच तांत्रिक कामासाठी माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर तर हार्बर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गौरसोय होणार आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकजण देवदर्शनाबरोबरच अप्तस्वकियांना शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडतात. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मध्य रेल्वने रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱया धिम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱया व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणार्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱया अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरिता जाणाऱया ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.