ईदची मिरवणूक गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी निघणार, तणाव टाळ्यासाठी निर्णय

फोटो प्रातिनिधीक

28 सप्टेंबर रोजी निघणारी ईदची ( Eid-e-Milad) मिरवणूक एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबईतील मुस्लिम संघटनांनी घेतला आहे. याच दिवशी गणपती विसर्जन असल्याने तणाव निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम संघटनांनी एकत्र येत ईदची मिरवणूक 29 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये विविध मुस्लिम संघटनांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ईद-ए-मिलादची मिरवणूक 29 सप्टेंबरला काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. ही बैठक भायखळ्यातील खिलाफत हाऊसमध्ये झाली होती. मौलाना मोईन अश्रफ काद्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मुंबईतील शांततेत बाधा येऊ नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तणाव टाळा आणि पुरोगामी विचारांची कास धरा अशी आम्हाला आमच्या धर्मगुरूंनी शिकवण दिली आहे. त्यामुळे देशात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही ईदची मिरवणूक 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे मौलाना मोईन यांनी सांगितले. सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्य नारायण चौधरी यांनी याबाबत बोलताना म्हटले की याबाबत पोलिसांना अधिकृतरित्या काही सांगण्यात आले नसले तरी या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुस्लिम समाजाने विसरजनाच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. यामुळे लोकांना होणारी गैरसोय कमी होईल.

खिलाफत हाऊसमध्ये झालेल्या बैठकीला काँग्रेसचे नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेससचे नसीम सिद्दीकी आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख हे उपस्थित होते. “मुस्लिम बांधव हे ईद एक मिलादची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीचे पावित्र्य जपले पाहिजे. मिरवणुकीत डीजे वाजवणे टाळले पाहिजे. या निमित्ताने काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशांपासू नदूर राहातइतर संघर्ष टाळला पाहिजे. ” असे खान यांनी म्हटले. 29 सप्टेंबरला सुट्टी जाहीर करावी यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भिवंडीचे आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी म्हटले की आम्हीही या निर्णयाचे पालन करू. 29 तारखेला मिरवणूक निघणं हे फायद्याचेही आहे कारण भिवंडीमधील बहुतांश कारखाने हेशुक्रवारी बंद असतात.