नांदेडच्या विमानसेवेचा अखेर शुभारंभ; उद्यापासून विमानसेवा सुरू

बहुप्रतिक्षित असलेली नांदेडची विमानसेवा अखेर उद्यापासून (31 मार्च 2024) सुरू होणार आहे. उद्यापासून दररोज नांदेड ते बंगळुरू, नांदेड-दिल्ली-जालंदर तर आठवड्यातून काही दिवस नांदेड-हैद्राबाद व नांदेड ते अहमदाबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे.

2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड विमानतळावरुन ‘उडे देश का हर आदमी’ या योजनेतंर्गत विमानसेवेचा प्रारंभ केला होता. काही दिवस ही विमानसेवा चालली आणि नंतर बंद पडली. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्र शासन व खाजगी संस्था यांच्यामध्ये समन्वय नसल्याने विमानतळावरील सुरक्षा, विद्युत व अन्य सेवेचा बोजवारा उडाला होता. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नांदेडला ठरल्यानंतर कामकाजाला वेग आला.

नांदेड विमानतळावरील सेवा व दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले तसेच नाईट लँडिंगचीही व्यवस्था करण्यात आली. नंतरच्या काळात काही कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्यात रस दाखवला. त्यात स्टार एअरने सर्व्हेक्षण केले. सुरुवातीला नांदेड ते पुणे ही विमानसेवा सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र पुणे विमानतळावर जागा मिळत नसल्याने ही विमानसेवा बासनात पडली. आता स्टार एअरने उद्या 31 मार्चपासून दररोज नांदेड ते बंगळुरू, नांदेड-दिल्ली-जालंदर ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची बुकींग पंधरा दिवसापासून सुरू झाली आहे.

विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार नांदेड ते बंगळुरू हे विमान नांदेड विमानतळावरुन 4.45 वाजता सुटेल व 6.05 मिनिटांनी बंगळुरू येथे पोहचेल. तर बंगळुरू ते नांदेड हे विमान बंगळुरूहून सकाळी 7.15 मिनिटांनी सुटेल तर नांदेडला सकाळी 8.35 मिनिटांनी पोहचेल. नांदेड ते दिल्ली हे विमान सकाळी 9 वाजता सुटेल तर 11 वाजता दिल्लीला पोहचेल. नांदेडहून जालंदरला जाणार्‍या प्रवाशांना नांदेड-दिल्ली-जालंदर असा प्रवास करावा लागणार असून, दिल्लीहून हे विमान 11.25 वाजता सुटेल व 12.25 मिनिटांनी जालंदरला पोहचेल. नांदेड ते हैद्राबाद ही विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी रोजी सुरू होणार असून, सायंकाळी 4.30 मिनिटांनी हे विमान नांदेड विमानतळावरुन सुटेल व सायंकाळी 5.20 मिनिटांनी हैद्राबादला पोहचेल.

हैद्राबादहून हे विमान सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार रोजी सकाळी 7.55 मिनिटांनी सुटेल. तर 8.45 मिनिटांनी नांदेडला पोहंचेल. नांदेड ते हैद्राबाद या मार्गासाठी बुधवारी विशेष विमानसेवा सुरू करण्यात आली असून, सकाळी 9.15 वाजता हे विमान नांदेड विमानतळावरुन सुटेल व सकाळी 10.05 वाजता हैद्राबाद विमानतळावर पोहचेल. तसेच नांदेड ते अहमदाबाद ही विमानसेवा देखील उद्यापासून सुरु होणार असून, सकाळी 9.10 वाजता नांदेड विमानतळावरुन हे विमान सुटेल व अहमदाबादला सकाळी 11.25 मिनिटांनी पोहचेल. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवार अशी ही विमानसेवा असणार आहे. जगप्रसिध्द सचखंड गुरुद्वारासाठी सबंध जगभरातून शिख बांधव नांदेडला येतात. त्यांना आता या सेवेचा लाभ घेता येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारी ही विमानसेवा कधीपर्यंत सुरू राहील, हे आता प्रवाशांच्या संख्येवर अवलंबून आहे.