23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस; चांद्रयान उतरले तो भाग ‘शिवशक्ती पॉइंट’

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘इस्रो’च्या कमांड सेंटरला भेट देऊन ‘चांद्रयान-3’ च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी तीन मोठय़ा घोषणा केल्या. दरवर्षी 23 ऑगस्टला हिंदुस्थानात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा केला जाणार आहे. चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती पॉइंट’ तर चंद्रावर ज्या ठिकाणी ‘चांद्रयान-2’ चा स्पर्श झाला आहे त्या ठिकाणी ‘तिरंगा पॉइंट’ संबोधले जाणार आहे.

मोदी यांनी शास्त्रज्ञांसमोर 45 मिनिटे भाषण केले. ज्यावेळी ‘चांद्रयान-3’ चे लँडिंग झाले. त्या दिवशी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. नंतर ग्रीसला गेलो, परंतु माझे मन पूर्णपणे तुमच्याकडे लागले होते. माझे मन म्हणत होते की, तुम्हाला नमन करावे, परंतु मी हिंदुस्थानात पोहोचताच तुमच्या दर्शनासाठी आलो. मला तुम्हाला सॅल्यूट करायचे होते. सॅल्यूट तुमच्या परिश्रमाला… सॅल्यूट तुमच्या धैर्याला… सॅल्यूट तुमच्या भावनांना… असे मोदींनी म्हटले.

‘इस्रो’च्या टीमने हिंदुस्थानाला ज्या उंचीवर नेले ती काही साधी गोष्ट नाही. आपण अशा ठिकाणी पोहोचलो. जेथे कोणी पोहोचू शकले नाही. माझ्या डोळय़ांसमोर 23 ऑगस्टचा एक-एक सेकंद फिरतोय, मी तो कधीच विसरू शकणार नाही. विक्रम लँडरने चंद्रावर जो हिंदुस्थानचा ठसा सोडला तो जगाला दाखवण्याचे काम आपल्या देशाने केले आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेत महिलांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे. आपल्याला विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी करायचा आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

रोव्हर प्रज्ञानचा फेरफटका; रस्त्यावरील आलेला खड्डा केला पार

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शनिवारी ‘चांद्रयान-3’च्या प्रज्ञान रोव्हरचा आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. प्रज्ञान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फेरफटका मारताना दिसत आहे. एक दिवस आधी ‘इस्रो’ने रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर आठ मीटरचे अंतर यशस्वीपणे पार केल्याचे म्हटले होते. आता ताज्या व्हिडीओत हे रोव्हर शिवशक्ती पॉइंटच्या जवळपास फिरत असल्याचे दिसत आहे. ‘इस्रो’ने 40 सेकंदांचा व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्याच्या शोधात शिवशक्ती पॉइंटच्या जवळपास फिरत आहे.

इस्रोने आता सूर्य मोहिमेसाठी तयारी सुरू केली आहे. सूर्य मिशनसाठी ‘आदित्य एल-1’ला 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. एल-1 पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटर दूर आहे.