काँग्रेसला मत देऊ नका, पण माझ्या अंत्ययात्रेला या; मल्लिकार्जुन खरगे यांचे भावनिक आवाहन

लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी आता थांबली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी कर्नाटकातील कलबुर्गी या आपल्या गावी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. तुम्हाल काँग्रेसला मत द्यायचे नसेल, तर देऊ नका. मात्र, मी तुमच्यासाठी, जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी काही चांगली कामे केली, असे वाटेत असेल तर माझ्या अंत्ययात्रेला नक्की या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या कलबुर्गी या मतदारसंघातून त्यांचे जावई राधाकृष्ण डोड्डामणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आलेले खरगे अफजलपूर येथील सभेला भावून झाले होते. तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर आता मला कलबुर्गी येथे कोणतेच स्थान राहिले नाही, असे मला वाटेल. मी तुमचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलो, अशी माझी भावना होईल. एकवेळ काँग्रेसला मत दिले नाही तर चालेल, पण तुमच्यासाठी मी काही काम केले असेल तर माझ्या अंत्ययात्रेला नक्की या, असे ते जनतेला म्हणाले.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुकूमशाही विचारसरणीला पराभूत करण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. आपण जनतेसाठी काम करत असून जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मी निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा नसो. संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला लढा सुरू राहणार आहे. जनतेसाठी काम करत असल्याने राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि संघाच्या विचारधारेला पराभूत करण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे. मी त्यांच्यासमोर झुकणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करत नाही, तोपर्यंत राजकारणातून निवृत्त होऊ शकत नाही, असेही खरगे म्हणाले.