देशाची सुरक्षा व्यवस्था ‘राम भरोसे….; संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला फटकारले

संसदेत बुधावारी झालेली घुसखोरी आणि संसदेत धूर सोडल्याचे प्रकरण आता चांगलेच तापत आहे. या मुद्द्यावरून गुरुवारी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला फटकारले असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही केली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर लोकसभेत सुरक्षेचा भंग केल्याबद्दल टीका केली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या विषयावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

संसदेचे हिवाळी अधिवेशनाचे गुरुवारचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी बैठक घेतली आणि सुरक्षा भंगाचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदारपणे मांडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, सुरक्षेचे उल्लंघनाचा हा गंभीर मुद्दा आहे. ही घटना देशासाठी लाजिरवाणी आहे. आपण लोकशाहीचे मंदिर सुरक्षित ठेवू शकत नाही, तर आपण संपूर्ण देशाची कायदा आणि सुव्यवस्था कशी राखू शकतो. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे. याआधी 22 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतून आपण काय शिकलो? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, संसदेची सुरक्षा व्यवस्था भक्काम आहे. असे असतानाही काहीजणांनी संसदेत घुसखोरी केला. महिन्याभरापासून सरकार निवडणूक प्रचार, निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये सरकारची स्थापना, शपथविधी यात मग्न आहे. मात्र, देशाची सुरक्षा ‘राम भरोसे’…आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

काँग्रेस खासदार राजीव शुक्ला आणि इतर अनेक राज्यसभा खासदारांनी संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेवर कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली. संसदेत सुरक्षा भंगावर चर्चा करण्याची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या विषयावर उत्तर देण्याची मागणी केली. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना देऊन या विषयावर चर्चेची मागणी केली. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनीही सरकारवर निशाणा साधला आणि संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हे घुसखोर आत कसे आले? त्यांनी स्प्रे कॅन आतमध्ये कसे नेले? त्यांच्या व्हिजिटर पासवर कथित स्वाक्षरी करणाऱ्या खासदारावर सरकार काय कारवाई करणार? असे सवाल त्यांनी केले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही सरकारवर निशाणा साधला. भाजप खासदाराने घुसखोरांना प्रवेश दिला या वस्तुस्थितीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी दावा केला की घुसखोर काँग्रेस-कम्युनिस्ट पक्षांशी संबंधित होते. मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे की, ज्यांनी संसदेच्या सुरक्षेचा भंग केला त्यांचा काँग्रेस-कम्युनिस्ट पक्षांशी संबंध आहे. त्यातील काहजण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होते, असा दावाही मालवीय यांनी केला. या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले, अशी माहितीही त्यांनी दिली.