श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपचा अहंकार मोडून काढला; काँग्रेसचा भाजपला टोला

राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी धक्कादायक आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या रूपिंदर सिंह कुन्नूर यांनी पराभव केला आहे. या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपाचा अहंकार मोडून काढला, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.

या विजयानंतर सोशल मीडियावर विजयी उमेदवार रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा फोटो शेअर करत काँग्रेसने भाजपाला टोला लगावला आहे. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने सत्तेच्या अहंकारातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला मंत्री बनवून आचारसंहितेची खिल्ली उडवली होती. मात्र श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपचा हा अहंकार मोडीत काढला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्री रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा विजय झाला आहे. भाजपच्या अहंकारी नेत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांनी कुणालाही मंत्री बनवलं तरी शेवटी लोकप्रतिनिधी जनताच बनवते.

श्रीकरणपूर या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये 199 जागांसाठीच मतदान झालं होतं. तर श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच मतदान झालं होतं. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे. सुरेंद्र पाल सिंह टीटी यांनी दहा दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या सरकारमध्ये सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मात्र या पराभवामुळे त्यांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरलं आहे.