राजस्थानात अपघातानंतर कार आगीच्या वेढ्यात; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका विचित्र अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सिकर येथे रविवारी एका कारने ट३कला धडक दिली. या अपघातानंतर कारने पेट घेतला आणि गाडीतील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले 7 जण एकाच कुटुंबातील असून ते उत्तर प्रदेश मेरठ येथील आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. सालासर येथील बालाजीचे दर्शन करून मेरठ येथे परतत असताना हा अपघात झाला.

सालासर येथील पूलावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला. गाडीतील गॅस पाईप फुटल्याने अपघातानंतर गाडीने अचानक पेट घेतला. ट्रकमध्ये कापसाचे गठ्ठे होते. त्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. ग्रामस्थांनी गाडीतील प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेली आणि गाडीचे दरवाजे उघडत नसल्याने 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की काही क्षणातच गाडीतील सातही जणांचा मृत्यू झाला. ट्रकचालक आणि क्लिनर यांनी आग लागताच पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता.