22 जानेवारीला अयोध्येला येऊ नका; राम मंदिर ट्रस्टचे भाविकांना आवाहन

अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहिले आहे. नवीन वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गर्भगृहात स्थापित होणारी रामललाची मूर्ती पाहण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेत राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी भाविकांना 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका, असे आवाहन केले आहे. तसेच या भव्य सोहळ्याची माहिती दिली. हा सोहळा 22 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे. मूर्तीप्रमाणेच गर्भगृहही तयार आहे, मात्र संपूर्ण मंदिराच्या उभारणीला आणखी दोन वर्षे लागू शकतात, असेही ते म्हणाले.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विविध राज्यांतील अनेक लोक अयोध्येला येण्याची शक्यता आहे. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेत ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या काळात भाविकांना अयोध्येत येऊ नेय, अशी विनंती केली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत येण्याऐवजी तुमच्या जवळच्या मंदिरात ‘आनंद महोत्सव’ साजरा करा. 22 जानेवारीला अयोध्येत येऊ नका… तुमच्या जवळच्या मंदिरात एकत्र जमा, मग ते लहान असो किंवा मोठे… तुम्हाला शक्य असेल त्या मंदिरात जा आणि तिथे दर्शन घ्या. जेणेकरून अयोध्येत गर्दी होऊ नये म्हणून आम्ही हे आवाहन करत आहोत, असे चंपत राय यांनी सांगितले.

अभिषेक समारंभासाठी वैदिक विधी मुख्य समारंभाच्या एक आठवडा आधीपासून 16 जानेवारीपासून रोजी सुरू होईल. अभिषेक सोहळ्यातील मुख्य विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ‘टेंट सिटी’ बांधण्यात येत असून, त्यामध्ये 80 हजार भाविकांची राहण्याची सोय केली जाणार आहे. यामध्ये जेवणाचीही उत्तम व्यवस्था केली जाईल. मात्र, या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने राय यांनी हे आवाहन केले आहे.