अक्कलकोट तालुक्यातील नैसर्गिक पाणवठे पडले कोरडे; वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण

अक्कलकोट तालुक्यात गतवर्षी पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पशूपक्ष्यांची पाण्यासाठी वणवक्षण भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

गतवर्षी पावसाळा हा अत्यल्प झाल्याने सध्या सर्वत्र पाण्याचा दुष्काळ पडल्याचे दिसत आहे. अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांची, महिलांची काही गावांत भटकंती सुरू आहे. पाण्याचा जसा फटका नागरिकांना बसला आहे, तसाच फटका पशूपक्षी, वन्य प्राण्यांना बसत आहे. मागील वर्षी पाऊस न झाल्याने अक्कलकोट तालुक्यातील नैसर्गिक पाणवठे तलाव, पाझर तलाव, नदी, नाले, ओढे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. पुढील एप्रिल, मे महिन्यात वन्य प्राण्यांचा पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे. सध्याची भीषण पाणीटंचाई पाहता पुढील दोन-तीन महिने पावसाळा येईपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.