नवनीत राणा 6 महिन्यांत जेलमध्ये दिसतील; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

prakash-ambedkar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या मुलुंड कोर्टात घिरटय़ा घालत आहेत. येत्या सहा महिन्यांत त्या जेलमध्ये तुम्हाला दिसतील, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केले. ते अमरावती येथे बोलत होते.

अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या मुद्दय़ांवर आपले मत व्यक्त केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न अॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी हा मोठा दावा केला आहे. खासदार नवनीत राणा 6 महिन्यांत जेलमध्ये दिसतील. त्या सध्या कोर्टात घिरटय़ा घालत आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.