छगन भुजबळांना भाजपाने स्क्रीप्ट लिहून दिली, रोहित पवार यांची टीका

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाविरुद्ध पुढे करून व्हिलन बनवायचे आणि स्वतः सुरक्षित रहायचे असा भारतीय जनता पक्षाचा डाव असून भाजपनेच भुजबळांना स्क्रीप्ट लिहून दिली, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला.

मनोज जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणासाठी आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनीच उपोषणाला बसवले, असा आरोप छगन भुजबळ यांनी जालना येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात केला होता. त्याला रोहित पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले की, भुजबळसाहेबांचा अनुभव मोठा आहे. मोठी मोठी खाती त्यांनी सांभाळली आहेत, पण त्यांनी ओबीसी खाते बघितलेले नाही. ओबीसी खात्याला निधीची तरतूद कमी आहे. त्यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याने खालच्या पातळीत भाषण केल्यामुळे त्यांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली असावी असे वाटते. रोहित पवार यांनी या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ‘‘पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना ओबीसी मेळाव्याला जाऊ नका असे सांगितले होते. काही नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यांनी पंकजा मुंडेंना जाऊ दिले नाही, कारण त्या लोकनेत्या आहेत हे फडणवीसांना पटत नाही. एकनाथ खडसेंचीही ताकद त्यांनी अशीच कमी केली. आता भुजबळांना लोकांपुढे करताहेत,’’ अशी टीका रोहित पवार यांनी केली.