आज फक्त सेलिब्रेशन! दोन वर्षांनंतर होणार ‘थर्टी फर्स्ट’ची धम्माल; कॅलेंडर आणि दिवसही पालटणार

कोरोनाच्या भीतीच्या छायेत 2022 हे वर्ष उजाडले होते. हळूहळू मळभ दूर होत गेले. अर्थचक्र रुळावर आले पण धाकधूक कायम होती. कोरोनाने ग्रासलेले हे आणखी एक वर्ष उद्या सरेल. त्यासोबत क@लेंडर आणि दिवसही पालटेल. नवी उमेद घेऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघे जग आतुर आहे. चीनमधील नव्या कोरोना व्हायरसचे संकट घोंगावत असले तरी येणारे 2023 हे वर्ष कोरोनामुक्त असू दे ही प्रत्येकाच्या मनीची आस आहे. तेव्हा आज फक्त आणि फक्त सेलिब्रेशन… कोणत्याही निर्बंधांचा पाश नाही. तब्बल दोन वर्षांनंतर थर्टी फर्स्टची धम्माल मनसोक्त लुटायचीय. आजची रात्र नववर्षाच्या स्वागताची आहे… जागावे तर लागणारच आहे.   सरत्या वर्षाला निरोप द्यायची आणि नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जंगी बेत आधीच आखले गेलेले आहेत. थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनचा माहोल सगळीकडेच दिसून येत आहे.

चार विशेष लोकल धावणार

मुंबईत थर्टी फर्स्टच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीसह अन्य समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे चार विशेष लोकल चालवणार आहे. पहिली विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटून 3 वाजता कल्याणला पोहोचेल. दुसरी लोकल कल्याण येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटणार असून पहाटे 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे. तिसरी लोकल हार्बर मार्गावर मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता लोकल सुटणार असून 2.50 वाजता पनवेलला पोहचेल तर चौथी लोकल पनवेल येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटून 2.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे. या गाडय़ांना सर्व स्थानकांत थांबा देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर आठ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

दुमजली ओपन डेक बस धावणार

 मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत मोकळय़ा हवेचा गारवा घेत साजरे करता यावे यासाठी ‘बेस्ट’ 31 डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत अतिरिक्त पाच बस सोडल्या जाणार आहेत. या खुल्या दुमजली बसेस प्रवाशांच्या सेवेत शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत धावणार आहेत. त्याशिवाय उद्या रात्री मुंबईतील विविध भागांत मागील वर्षापेक्षा दुप्पट म्हणजेच एकूण 50 जादा बसगाडय़ा चालविण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला आहे.

साईमंदिर रात्रभर खुले राहणार

साईबाबांचे दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याची साईभक्तांची परंपराच बनली आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा आकडा पाच लाखांहून अधिक असण्याची शक्यता असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला असून दर अर्ध्या तासाला साधारण 10 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.

थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरला वीपेंडची जोड मिळाल्याने मुंबईकर भन्नाट मूडमध्ये आहेत. सोसायटय़ांचे टेरेस, चाळीतली रिकामी रूम येथे पार्टीची जमवाजमव सुरू झाली आहे तर बार, रेस्टॉरंट्स, पंचतारांकित हॉटेल्समध्येही खास व्यवस्था केली गेली आहे.

शनिवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत वाइन शॉप्स खुले राहणार आहेत, तर बार आणि रेस्टॉरंट्सही पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला रात्रभर मुंबई झिंगणार हे पक्के आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे थर्टी फर्स्टचा रंग बेरंग झाला होता. यंदा मात्र छप्परफाड जल्लोष अनुभवता येणार आहे.

मुंबादेवी, महालक्ष्मी, सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी गजबजणार 

मुंबादेवी मंदिर भाविकांसाठी रविवार, 1 जानेवारी रोजी सकाळी 6.30 ऐवजी एक तास आधी पहाटे 5.30 वाजता खुले करण्यात येणार आहे. भाविकांसाठी मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली. महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कर्मचारी, सेवेकऱ्यांबरोबर अनिरुद्ध बापूंचे भक्त स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त शरदचंद्र पाध्ये यांनी दिली. प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे पहाटे सव्वातीनपासून दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात विशेष रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाच्या वेळा पहाटे 3 वाजून 15 मिनिटे ते 5 वाजून 15 मिनिटे, सकाळी 6 ते 11 वाजून 55 मिनिटे, दुपारी 12 वाजून 30 मिनिटे ते संध्याकाळी 7, रात्री 8 ते 11 वाजून 30 मिनिटे अशा आहेत.

हे लक्षात असू द्या

सोसायटीच्या टेरेसवर दे दणादण म्युझिकवर ठेका धरायचा असेल तर एक गोष्ट करावी लागणार आहे. सोसायटीकडून आणि स्थानिक पोलीस ठाण्याकडून त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी असेल. मात्र ऑइल पंपन्या आणि पेट्रोल पंप अशा ‘बफर झोन’जवळ फटाके पह्डू नयेत, असे बजावण्यात आले आहे.

कोरोनामुळे सलग दोन वर्षे थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक निर्बंध होते. गर्दी करण्यास मनाई होती, चारपेक्षा अधिक जण एकत्र आल्यास बडगा उगारला जात होता. मात्र यंदा असे कोणतेही निर्बंध नसतील.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दक्ष आहेत. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस, वांद्रे बॅण्डस्टॅण्ड, जुहू, वर्सोवा, गोराई बीच येथे विशेष पथके तैनात असतील. ड्रग्ज आणि रेव्ह पाटर्य़ांवरही करडी नजर असेल.

थर्टीफर्स्टसिक्स्टी, नाइंटी नंतर

कोणतेही निर्बंध नाहीत, वीपेंडमुळे सुट्टीचा प्रश्न नाही अशा माहोलात यंदाची थर्टी फर्स्टची रात्र रंगणार आहे. ‘पिनेवालों को पिने का बहाना चाहिए’ म्हणतात तो बहाणा मिळाला आहे. पार्टी दिवस मावळताच सुरू होईल आणि उत्तरोत्तर रंगात येईल. ‘थर्टी’ फर्स्ट… नंतर सिक्स्टी, नाइंटी असे सूत्रही अनेकांनी ठरवून ठेवले आहे. उद्याची पूर्ण रात्र सेलिब्रेशनची ठरणार आहे.