मुंबई, ठाण्यासह देशभरात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएचे छापे

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 12 ठिकाणांवर आज बुधवारी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे घातले. महाराष्ट्रातील मुंबई, ठाण्यासह देशभरात राजस्थान, मध्य प्रदेश, तामीळनाडू आणि दिल्ली येथे कारवाई करण्यात आली. देशभरात जातीय तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एनआयएने पहाटेपासूनच छापेमारीला सुरुवात केली.

2007 मध्ये मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 2015 मध्ये न्यायालयाने दोषमुक्त केलेल्या वाहीद शेख याच्या घरी पहाटे 5 वाजता एनआयएचे पथक धडकले, मात्र जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहीदने घेतला, परंतु तरीही एनआयएचे पथक दरवाजावरच ठाण मांडून बसले. अखेर पाच ते सहा तासांनंतर वाहीदने दरवाजा उघडला आणि पथकाने आपली कारवाई सुरू केली.

– मुंबईतील विक्रोळीसह नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडीमध्ये एनआयएने छापेमारी केली. देशभरात सुमारे 20 ठिकाणी कारवाई करण्यात आली. केस क्रमांक 31/2022 अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये एनआयएच्या पथकाने छापे घातल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

– मध्य प्रदेशातील भोपाळ येथे खानू गावात राहणाऱ्या मुश्ताक खान (60) या व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. त्याच्या मुलाचीही चौकशी करण्यात आली.

– राजस्थानमध्ये बडा क्षेत्र कुआ परिसरात जवळपास तीन ते साडेतीन तास कारवाई चालली. येथे अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.

– महाराष्ट्रात 3 ते 4 ठिकाणी एनआयएने छापे घातले. दरम्यान, एनआयएने मदुराई, तामीळनाडू येथील पीएफआयशी संबंधित ठिकाणांवरही कारवाई केली.

राबोडीत शाहिद नरेकरच्या घरावर छापा
सिमी संघटनेत सक्रीय असलेल्या शाहिद नरेकरच्या घरावर एनआयएच्या पथकाने पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास छापा घातला. शाहीदवर याआधीच यूएपीए कायद्या अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. पीएफआय संघटनेशी संबंधित प्रकरणात नरेकरची चौकशी करण्यासाठी एनआयए शाहिदच्या घरी धडकली. पण शाहिद मिळून आला नाही. त्यामुळे पथकाने शाहिदचा भाऊ अनीसची चौकशी करून घराची झडती घेतली. कारवाईदरम्यान कुठलेही पुरावे पथकाच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे चौकशी करून पथकाने अनीसला सोडल्याची माहिती समोर आली आहे.