घरवापसी सुरू, दादा गटाला पहिला धक्का; निलेश लंके यांनी ‘तुतारी’ फुंकली, आमदारकी सोडली

महाराष्ट्रात पह्डापह्डी करणाऱया भाजपला पहिला धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकल्याने नगर जिल्हय़ात अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपणास लोकसभा निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्याचे लंके यांनी जाहीर केले.

महायुती सत्तेत आल्यापासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाणीवपूर्वक मला व माझ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचा घाट घातला. त्यांच्या वारंवार होणाऱया त्रासामुळे आपण महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले. आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे मेलद्वारे व खास दूतामार्फत पाठविले आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सुपे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार नीलेश लंके बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संतोष इथापे होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दापुढे आमदारकी किरकोळ आहे. त्यांना आपण निवडणूक लढविण्याचा आणि निवडून येण्याचा शब्द दिला असल्याचे सांगत, लंके यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. शिवधनुष्य उचलले आहे. चक्रव्यूहात शिरलो आहे. त्यामुळे आता माघार नसल्याचे सांगत, त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

नीलेश लंके म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात खालच्या पातळीवर जाऊन त्रास देण्यात येत आहे. त्यासाठी अधिकाऱयांनाही वेठीस धरण्यात येत होते. किती दिवस त्रास सहन करणार? आम्हालाही स्वाभिमान आहे. अन्याय करणाऱयापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. ‘अरे’ला ‘का रे’ करण्याची ताकद आमच्यात आहे. परंतु कोणाची जिरवाजिरवी करण्यासाठी जनतेने आमदार केलेले नाही, याची जाणीव असल्याने आपण गप्प आहे. माझ्याकडे पगारी यंत्रणा नाही; पण जीवाला जीव देणाऱया कार्यकर्त्यांची फौज आहे. त्यांच्या जीवावरच लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण कोणत्याही परिस्थितीत किमान दोन लाख मतांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास नीलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाळासाहेब हराळ, टिळक भोस, नगरसेवक अमोल येवले, बाबासाहेब तरटे, अर्जुन भालेकर, राहुल झावरे, रा. या. औटी, कारभारी पोटघन, बाळासाहेब कावरे, योगेश मते, उमाताई बोरुडे, सुवर्णा धाडगे यांच्यासह श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मधल्या काळात माझ्यामुळे त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यातून आता काही प्रमाणात उतराई होता येणार आहे. त्यांना निवडणूक लढविण्याचा आणि निवडून येण्याचा शब्द आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर दिला. त्यामुळे तुमचा विचार घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केल्याचे आमदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले.

दुसऱयाच्या झेंडय़ावर पंढरपूरला जाणारी आपली अवलाद नाही!

‘दुसऱयाच्या झेंडय़ावर पंढरपूर करणारी आपली अवलाद नाही, अशी जोरदार टीका लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि त्यांचे खासदार पुत्र सुजय विखे यांच्यावर केली. भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे ते गेले होते. कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी गेलो म्हणून सांगितले आणि प्रत्यक्षात उमेदवारी मागायला गेले होते. त्यांना कोणीतरी सांगितले असेल की, दोन दिवसांत कांदा निर्यातबंदी उठणार आहे. त्यानंतर ते सगळीकडे पत्रकार परिषद घेऊन सांगत सुटले,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

शरद पवारांनी उडवली कॉलर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातारच्या मैदानात उतरले आहेत. साताऱयात शुक्रवारी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. उदयनराजेंनी उमेदवारीसाठी संपर्क केला आहे का? असे यावेळी पत्रकारांनी विचारले. त्यावर ‘नाही’ म्हणत पवारांनी उदयनराजे यांच्या स्टाईलप्रमाणे कॉलर उडवली. पवारांच्या या स्वॅगने सातारचा आखाडा पुन्हा चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)